दि.२१(पीसीबी)-खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध असून Employees’ Deposit Linked Insurance (EDLI) योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना कोणताही प्रीमियम न भरता जीवन विमा संरक्षण दिले जाते. पीएफ कापला जाणारा प्रत्येक कर्मचारी आपोआप या योजनेचा सदस्य बनतो आणि या विम्याचा संपूर्ण खर्च संबंधित कंपनीकडून उचलला जातो.
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून कमाल सुमारे ७ लाख रुपयांपर्यंत विमा रक्कम दिली जाते. ही रक्कम कर्मचाऱ्याचा पगार, पीएफमधील योगदान आणि नोकरीचा कालावधी यावर आधारित असते. विशेष म्हणजे, नोकरीच्या सुरुवातीच्या काळातही ही सुविधा लागू राहते आणि पहिल्याच वर्षात मृत्यू झाल्यास कुटुंबाला किमान ५० हजार रुपयांची मदत मिळते.
दरम्यान, नोकरी बदलल्यास ही सुविधा तत्काळ बंद होत नाही, मात्र यासाठी काही अटी पाळणे आवश्यक असते. जुना UAN सक्रिय ठेवणे, नव्या नोकरीत पीएफ योगदान सुरू ठेवणे आणि KYC व ई-नामनिर्देशन अद्ययावत ठेवणे गरजेचे असते. अन्यथा विमा संरक्षण बंद होऊ शकते.
या विम्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याने केलेल्या नामनिर्देशनातील व्यक्तीच दावा करू शकते. मृत्यूनंतर नॉमिनीने Form 5IF सोबत मृत्यू प्रमाणपत्र आणि KYC कागदपत्रे EPFO कडे सादर करावी लागतात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे ३० दिवसांत विमा रक्कम दिली जाते.
एकूणच, EPFO ची ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत असून योग्य माहिती आणि कागदपत्रे अपडेट ठेवल्यास या सुविधेचा पूर्ण लाभ घेता येऊ शकतो.









































