‘श्रीमंत’ पिंपरी चिंचवडची ‘भिकार‘ अवस्था थकबाकी तत्काळ भरावी, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा

0
3

देणेदारी, कर्जदारी, लावायची रक्कम मिळून तब्बल सात हजार कोटी रुपयांची

दि.२१(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना धरणातून उचलण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी आणि पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका ठेवत आकारलेल्या दंडाची अशी १४३ कोटी रुपयांची थकबाकी तत्काळ भरावी, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेले नागरिक अपुरा, विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या समस्येने त्रस्त असतानाच आता ऐन उन्हाळ्यात शहरातील पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेकडून मंजूर काेट्यापेक्षा जास्त पाणी वापरले जात असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. मर्यादेपेक्षा जास्त पाणी वापरल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे महापालिकेने मर्यादेमध्येच पाण्याचा वापर करावा, अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे. मात्र, महापालिका मंजूर असलेल्या काेट्याप्रमाणेच पाणी उचलते, असा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने मावळातील पवना धरणातून पाणी पुरवठा केला जाताे. पवना नदीवरील रावेत बंधारा येथून महापालिका ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) अशुद्ध पाणी उचलते. या पाण्यावर निगडी, प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केले जाते. येथून शहरातील विविध भागाला जलकुंभाच्या माध्यमातून पाणी वितरित केले जाते. जलसंपदा विभागाकडून मावळातील पवना धरणातील ५५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी काेटा पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर आहे. त्यानुसार महापालिकेला जलसंपदा विभागाकडून पाणीपट्टीची आकारणी केली जाते. पाणी शुद्ध करत नसल्याचा ठपका, १४३ काेटींची थकबाकी झाली आहे. ही थकबाकी तत्काळ भरावी, अन्यथा पाणी पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

२७५ दशलक्ष लिटर पाण्यावरच प्रक्रिया

महापालिकेच्या दहा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाणी शुद्ध करण्याची क्षमता ३४५ दशलक्ष लिटर आहे. प्रत्यक्षात महापालिकेकडून केवळ २७५ दशलक्ष लिटर पाणी शुद्ध केले जाते. त्यामुळे २७५ दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया न करता नदीत साेडले जात असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. प्रक्रिया केलेले सांडपाणी सिंचनास उपलब्ध करून दिले जात नसल्याचा ठपकाही ठेवला आहे. त्यामुळे महापालिकेला जलसंपदा विभागाकडून दंड आकारण्यात येत आहे.

महापालिकेकडून पाणीपट्टी नियमित भरली जात आहे. गुरुवारी रात्रीच आठ कोटी सहा लाखांची पाणीपट्टी भरली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया न केल्यामुळे जलसंपदा विभागाकडून दंड आकारला जात आहे. थकबाकी भरण्याबाबत जलसंपदा विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.