जागतिक तणावाचा भारतावर परिणाम; एलपीजी टंचाईमुळे रांगा, जाणून घ्या कोणत्या राज्यातएलपीजी सर्वाधिक वापर

2 Min Read

दि.१६(पीसीबी)-इराण, इस्रायल आणि अमेरिकेमधील वाढत्या युद्धतणावाचा परिणाम आता संपूर्ण जगावर दिसू लागला आहे. इराणने हॉर्मुज सामुद्रधुनी बंद केल्यामुळे जागतिक इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत.देशातील अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हॉटेल चालकांना पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे, तर अनेक कुटुंबांनी इंडक्शन कुकटॉपचा वापर करून सिलिंडर टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दरम्यान, भारतात एलपीजी वापर करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उत्तर प्रदेश हे राज्य या यादीत सर्वात पुढे असून येथे सुमारे ४.८७ कोटी नागरिक एलपीजीचा वापर करतात. हे देशातील एकूण घरगुती एलपीजी वापरकर्त्यांपैकी सुमारे १५ टक्के आहे.याशिवाय महाराष्ट्रात सुमारे ३.०२ कोटी, पश्चिम बंगालमध्ये २.७२ कोटी, तामिळनाडूत २.४ कोटी, तर बिहारमध्ये २.३३ कोटी नागरिक एलपीजीचा वापर करतात.

देशात सध्या ३३ ते ३४ कोटी घरगुती एलपीजी वापरकर्ते आहेत. गेल्या दशकात सरकारच्या विविध योजनांमुळे आणि पुरवठा नेटवर्क वाढल्यामुळे शहरांसह ग्रामीण भागातही गॅसचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे लाकूड, कोळसा आणि केरोसिनसारख्या पारंपारिक इंधनांवरील अवलंबित्व कमी झाले आहे.

यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ इंधन मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात १०.५६ कोटी एलपीजी कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत.

या योजनेच्या लाभार्थ्यांमध्येही उत्तर प्रदेश आघाडीवर असून येथे सुमारे १.८८ कोटी कुटुंबांना एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये १.२४ कोटी आणि बिहारमध्ये १.१८ कोटी लाभार्थी आहेत.

जागतिक राजकीय तणाव आणि इंधन पुरवठ्यावर त्याचा होणारा परिणाम लक्षात घेता, आगामी काळात ऊर्जासुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Share This Article