दि.१६(पीसीबी)-MBBS च्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने १७ पानी सुसाईड नोट लिहून आयुष्य संपवलं आहे. AIIMS राजकोट या ठिकाणी हा विद्यार्थी MBBS च्या शेवटच्या वर्षात शिकत होता. त्याची १७ पानांची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.
१४ मार्चला एका विद्यार्थ्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आला होता. ज्या मुलाने आत्महत्या केली तो मूळचा राजस्थानच्या जैसलमेरचा होता. त्याचा जो काही छळ केला जात होता तो असह्य झाल्याने या मुलाने आयुष्य संपवलं आहे. जानेवारी २०२६ पासून माझा छळ होत होता असं मुलाने त्याच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. या मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे पाच आरोपी राजस्थान, हरियाणा आणि भरुच येथील आहेत. एका मुलीशी मैत्री असल्याने हे पाचजण आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला चिडवायचे आणि त्याचा छळ करत होते. आपल्याबरोबर काय घडलं? ते या विद्यार्थ्याने त्याच्या १७ पानांच्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. २७ जानेवारीला आपल्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आता अशी वेळ आली आहे की आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही असं या मुलाने या नोटमध्ये म्हटलं आहे.










































