राज्यपालांचे अभिभाषण राज्याच्या प्रगतीची खरी दिशा दर्शवणारे; आमदार अमित गोरखे यांच्याकडून स्वागत
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम श्री. आचार्य देवव्रत जी यांनी विधिमंडळात मांडलेले विचार हे राज्याच्या सर्वांगीण प्रगतीची आणि विकासाची खरी दिशा दाखवणारे आहेत. हे अभिभाषण शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि उपेक्षितांच्या कल्याणाचा जाहीरनामाच आहे, अशा शब्दांत भाजप आमदार अमित गोरखे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाचे मनापासून स्वागत केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आपली प्रतिक्रिया देताना आमदार गोरखे यांनी सरकारच्या विविध लोकोपयोगी निर्णयांवर प्रकाश टाकला.
शेतकरी कल्याणाचे ऐतिहासिक निर्णय
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, मी जरी शहरी भागाचे प्रतिनिधित्व करत असलो, तरी ग्रामीण भागातील शेतकरी हा राज्याचा कणा आहे हे विसरता येणार नाही. सरकारने शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी ‘कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण’ (Agri-AI Policy) आणले आहे, जे क्रांतिकारक ठरेल. ‘मुख्यमंत्री बळीराजा रस्ते योजने’मुळे शेतीमालाची वाहतूक सुलभ झाली असून, नैसर्गिक आपत्तीच्या काळात १५,००० कोटींहून अधिकची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून सरकारने मोठा आधार दिला आहे.
त्यांनी पुढे नमूद केले की, दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आणि ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या पंपांना मोफत वीज देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी झाले आहे.
ग्रामीण सक्षमीकरण आणि मराठी भाषेचा गौरव
ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, तांत्रिक शिक्षण मराठी भाषेत घेता यावे यासाठी १५४ विषयांचे साहित्य मराठीत उपलब्ध करून देणे हा आपल्या मातृभाषेचा मोठा सन्मान आहे. तसेच, बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे.
औद्योगिक विकास आणि पिंपरी-चिंचवडचा दबदबा
पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक प्रगतीवर भाष्य करताना आमदार गोरखे यांनी सांगितले की, आज आमच्या पिंपरी-चिंचवड शहरात हुंडाई आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या जागतिक कंपन्या येत आहेत. १५० एकरमध्ये हुंडाई सारख्या कंपनीचा प्रकल्प येणे हे राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील मोठे यश आहे.”
सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक न्याय
स्वराज्याच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. आर्टी (BARTI) आणि सारथीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वेगाने सुरू आहे. समाजकल्याण विभागामार्फत नवीन वसतिगृहे उभारून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला जात आहे.
‘अ, ब, क, ड’ आरक्षणाच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष
आपल्या भाषणाच्या शेवटी आमदार अमित गोरखे यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, अनुसूचित जातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणाचा (अ, ब, क, ड) प्रश्न सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तो मार्गी लावावा. जर हा प्रश्न सुटला, तर खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समृद्ध महाराष्ट्र घडेल. महाराष्ट्र म्हणजे केवळ भूमी नाही, तर तो शौर्य आणि सामाजिक न्यायाचा वारसा आहे.













































