दि.१०(पीसीबी)- तुम्ही घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. KYC प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना आता गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुण्यासह अनेक भागांमध्ये सुरू झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, केवायसी पूर्ण नसल्यास गॅस बुकिंग ऑनलाइन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी तातडीने आपल्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन वितरकांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, गॅस वितरण नियमांमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. दोन गॅस सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी २१ दिवसांवरून वाढवून ३० दिवस करण्यात आला आहे. त्यामुळे एकदा सिलिंडर घेतल्यानंतर पुढील बुकिंगसाठी आता किमान ३० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला असून त्याचा परिणाम एलपीजीच्या उपलब्धतेवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रलंबित केवायसी आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवरही दबाव वाढला असल्याचे वितरकांनी सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा गॅस बुकिंगमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










































