अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर श्रीनगरमधील लाल चौकात मुस्लिमांची निदर्शने

PCB Admin
1 Min Read

इस्रायली आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर श्रीनगरमधील लाल चौकात काश्मिरी शिया मुस्लिमांनी निदर्शने केली. या वेळी निदर्शकांनी अमेरिकेविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला. त्यांच्या हातात खामेनी यांचे फोटो होते आणि त्यांच्यासाठी विशेष प्रार्थनाही करण्यात आली. इराण हा शिया मुस्लिमबहुल देश असल्याने भारतातील शिया समाजातही तीव्र भावना व्यक्त होत असल्याचे दिसून आले.

शनिवारी इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर संघर्षाची तीव्रता वाढली. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे कारवाई केल्याचे वृत्त आहे. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला. तसेच आखाती देशांतील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

संयुक्त कारवाईत खामेनींचा मृत्यू
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या कारवाईची पुष्टी करत खामेनी यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले. इस्रायलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’ला दिलेल्या माहितीनुसार, खामेनी यांचा मृतदेह सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच ‘एएनआय’नेही याबाबत वृत्त दिले आहे.

Share This Article