स्वातंत्रवीर सावरकर यांचा आत्मार्पण दिन

2 Min Read

निगडी, दि. २६ : क्रांतिकारकांचे मेरूमणी, प्रखर राष्ट्रभक्त, हिंदू संघटक, प्रज्ञावंत साहित्यिक, अमोघ वक्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर पातळीवर अभिवादन करण्यात आले. विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अभिनव भारत विचार मंचाच्य वतीने स्वा. सावरकर उद्यान (गणेश तलाव ) येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करण्यात आला.. यावेळी नगरसेविका शैलेजा मोरे, नगरसेवक अमित गावडे व राजू मिसाळ , माजी नगरसेविका डॉ. गिता आफळे, विनोद बन्सल, मिलिंद देशपांडे, प्रा. शैलजा सांगळे, विजय सिनकर, सुशील मुथीयान, राज अहेरराव, नरेन्द्र पेंडसे, रमेश बनगोंडे आदि मान्यवर उपस्थित होते. मंचाच्या वतीने भास्कर रिकामे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कृतज्ञता व्यक्त केली.

अभिनव भारत विचार मंचाचे निमंत्रक राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविक केले, त्यावेळी ते म्हणाले….”सावरकर हे जाज्वल्य देशाभिमानी होते. सशस्त्र क्रांतीचा उद्घोष करून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला त्यांनी नवी दिशा दिली. समाज जागृती, समाज संघटन, भाषाशुद्धी आदी अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या चरित्रात आढळतात. त्यांच्या बद्दल च्या प्रमादाची चर्चा करताना त्यांच्या सर्वांगीण कार्याची दखल घेतली जात नाही , हे दुर्दैव आहे. “

प्रमुख वक्ते ऍड. अरविंद वाडकर यांनी “स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे योगदान” या विषयावर आपले मत मांडले. वाडकर म्हणाले की, ” सावरकर हे जगाच्या इतिहासामध्ये एकमेव असे क्रांतिकारक आहेत की , त्यांना दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली होती . सावरकर कुटुंबीयांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केलेला आहे. त्यांचे साहित्य हे देश प्रेमाने भारलेले होते. क्रांतीचा महामंत्र त्यांनी देशाला व तरुणांना दिला . खऱ्या अर्थाने सावरकर त्यांच्या अभ्यासकांना व टीकाकारांना सुद्धा व्यवस्थित समजले नाहीत ही शोकांतिका आहे. सावरकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत ज्यातून तरुणांना देश प्रेमाची प्रेरणा मिळेल .” असे ते म्हणाले..

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजेंद्र बाबर यांनी विशेष सहकार्य केले. मंचाचे संयोजक अतुल इनामदार, सचिन कुलकर्णी, डॉ. हेमंत देवकुळे, यांच्या हस्ते उपस्थितीतांचे सत्कार करण्यात आले. निमंत्रक विश्वास करंदीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.
उमेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन व सुत्रसंचालन मंचाचे समन्वयक भास्कर रिकामे यांनी केले.

Share This Article