अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

0
8

२०२५ मध्ये २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त; ५ वर्षांत १८ हजार आरोपी गजाआड

मुंबई, दि. २४ – राज्यात गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूवर कडक कायदेशीर बंदी असतानाही छुप्या मार्गाने विक्री आणि उत्पादन जोरात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नामुळे समोर आले आहे. गेल्या पाच वर्षांत पोलीस प्रशासनाने १३ हजार ७८३ गुन्हे दाखल करत तब्बल १८ हजार ५०१ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एकट्या २०२५ या वर्षात तब्बल २३९ कोटी १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आमदार जगताप यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे नाशिक, ठाणे आणि अहिल्यानगरमधील कोट्यवधींच्या गुटखा तस्करीचे धागेदोरे समोर आले आहेत. दरम्यान नाशिक आणि ठाणे जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यात २० जुलै २०१२ पासून दरवर्षी गुटखाबंदीचे आदेश नूतनीकरण केले जातात. सध्याच्या अधिसूचनेनुसार, राज्यात गुटखा उत्पादन, साठा, वितरण आणि वाहतुकीवर पूर्णतः बंदी आहे. मात्र तरीही मुंबई ,ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात अवैधरीत्या गुटख्याचे उत्पादन व विक्री सुरु असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान याचे लोन अनेक शहरांमध्ये देखील पसरत आहे. याचा धागा जोडत आमदार जगताप यांनी तारांकित प्रश्नांच्या (क्रमांक २३१२७) माध्यमातून गुटखाबंदीचा ढिसाळपणा शासनाच्या निदर्शनास आणून दिला. गुटखाबंदी संदर्भात राज्य शासनाकडून कोणती उपाययोजना केली जात आहे.याची विचारणा देखील त्यांनी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षांतील पोलीस कारवाईची सांख्यिकी सादर केली. अन्न सुरक्षा व मानके कायद्या’नुसार दोषींवर कारवाई सुरू आहे यात सातत्य राखले जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

पाच वर्षांतील कारवाईचा ‘ग्राफ’

वर्ष, दाखल गुन्हे, उघड गुन्हे, अटक आरोपी
२०२१, “२,६९७”, “२,६९४”, “३,९३४”
२०२२,” २,३८७”, “२,३७८”, “३,३३२”
२०२३, “३,४७७”, “३,४६९”, “४,३९४”
२०२४,” २,७८४”, “२,७७७”, “३,६६८”
२०२५ ,”२,४३८”, “२,४१४”, “३,१७३”
एकूण, “१३,७८०”, “१३,७३२”, “१८,५०१”

“राज्यातील तरुण पिढीला व्यसनाधीनतेच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यासाठी मुख्यमंत्री तसेच संबंधित विभागांच्या माध्यमातून केले जाणारे प्रयत्न दिलासादायक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरातून स्पष्ट होत आहे . मात्र केवळ कागदोपत्री आकडेवारी न दाखवता, प्रत्यक्ष  गुटखा विक्री शून्यावर आणण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत, यासाठी माझा पाठपुरावा सुरूच राहील.” 
शंकर जगताप, आमदार, पिंपरी चिंचवड*