मुंबई महापालिकेत नवे समीकरण? प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून ठाकरे गट-मनसेत चर्चा

PCB Admin
2 Min Read

दि.२२(पीसीबी)- मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना (ठाकरे गट) आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महापालिकेतील संख्याबळानुसार ठाकरे गटाकडे सात प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येत आहेत. यापैकी एक किंवा दोन पदे मित्रपक्ष मनसेला देण्याबाबत प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्यात बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीत पदवाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली असून अंतिम निर्णयापूर्वी आणखी एक-दोन बैठका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी ठाकरे बंधूंनी एकत्र येत राजकीय समीकरण बदलले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यांत दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. विशेषतः राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर झालेल्या सूचक टीकांमुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली होती.

दरम्यान, ठाकरे गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता कमी झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.

आगामी बैठकीनंतर अंतिम निर्णय स्पष्ट होणार असून ठाकरे बंधूंच्या राजकीय समीकरणाचा पुढील टप्पा काय असेल, याकडे मुंबईच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Share This Article