नवी सांगवी,पिंपळे गुरव परिसरात अनधिकृत व्यावसायिक बांधकामांचा सुळसुळाट कारवाई न झाल्यास न्यायालयात जाणार – माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा इशारा

0
16

दि.१८(पीसीबी)- नवी सांगवी ,पिंपळे गुरवसह शहराच्या विविध भागात बांधकाम विषयक नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून ती तात्काळ भुईसपाट करावीत, अशी मागणी माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

नवी सांगवी ,पिंपळे गुरवच्या विविध भागांत कोणतीही परवानगी न घेता इमारतींवर मजल्यावर मजले चढवणे, व्यावसायिक वापरासाठी इमारतींचे रूपांतर करणे, तसेच मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गाळे उभारणे असे प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अनधिकृत बांधकामांना राजकीय वरदहस्त मिळत असून मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामे होणे शक्य नसल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. विशेषतः निवडणूक काळात अशा बांधकामांना अधिक वेग आल्याचेही निदर्शनास आणण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, नवी सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मधील चैत्रबन सोसायटी परिसरात भाजप नगरसेवकांकडून सहा मजली अनधिकृत बांधकाम उभारण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या सर्व प्रकरणांचा मनपा प्रशासनाने तातडीने सर्व्हे करून नियमबाह्य बांधकामांवर जमीनदोस्त कारवाई करावी, तसेच संबंधित अधिकारी व दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, कारवाई न झाल्यास राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देण्यात येईल तसेच प्रसंगी न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशाराही जगताप यांनी दिला आहे.

परिसरातील अनधिकृत व्यावसायिक बांधकामांना भाजपच्या बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप राजेंद्र जगताप यांनी केला आहे. सामान्य नागरिकांना त्यांच्या जागा विकण्यास भाग पाडले जाते, तसेच भागीदारीच्या नावाखाली सदनिका उभारल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.“तीन मजल्यांपर्यंत बांधकाम केले असल्यास वरच्या सदनिका आम्हाला द्या, अन्यथा कारवाई करू,” असा सज्जड दम काहींकडून दिला जात असल्याचाही त्यांनी आरोप केला.

सामान्य नागरिकांच्या बांधकामांना विरोध नाही
“आमचा सामान्य नागरिकांच्या बांधकामांना विरोध नाही; मात्र व्यावसायिक स्वरूपाची अनधिकृत बांधकामे तात्काळ थांबवावीत,” अशी स्पष्ट भूमिका राजेंद्र जगताप यांनी मांडली.