वाल्हेकरवाडी येथील श्री महादेव मंदिराचा वर्धापन दिन व महाशिवरात्री महोत्सव उत्साहात

0
5

श्री महादेव मंदिर वाल्हेकरवाडी येथे वर्धापन दिन व महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. विविध धार्मिक कार्यक्रम, पूजन आणि कीर्तनसेवा यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

या कार्यक्रमास आमदार शंकर जगताप, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, निलेश तरस ,पल्लवी वाल्हेकर,ऐश्वर्या तरस शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, प्रेरणा बँकेचे चेअरमन कांतीलाल गुजर, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, युवानेते शुभम दिलीप वाल्हेकर, श्रीधर वाल्हेकर, माऊली सूर्यवंशी, बापू कातळे, राजेंद्र तरस, कैलास गावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

ह.भ.प. साहेबराव महाराज टाकळकर आणि ह.भ.प. ओमकार महाराज दुडे (शास्त्री) यांनी कीर्तनसेवा सादर केली.

आमदार शंकर जगताप यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाने आपल्या आतील ‘शिवतत्त्व’ ओळखण्याचे आवाहन केले. “शिव म्हणजे कल्याण. आपले कल्याण आपल्या हातात आहे. जो चांगल्या मार्गाचा स्वीकार करतो, त्याला चांगल्याच गोष्टी प्राप्त होतात. अध्यात्म माणसाला चांगुलपणा शिकवते,” असे ते म्हणाले.

ओमकार महाराज दुडे (शास्त्री) यांनी आपल्या प्रवचनातून संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेश स्पष्ट करताना सांगितले की, सत्संगामुळे मनातील संभ्रम नाहीसा होतो आणि भोग-विलासापेक्षा आध्यात्मिक आनंद श्रेष्ठ आहे. ज्याच्या घरी ताकाचे साधे सरोवर असते, त्यालाही भक्तीमुळे नवनीतासारखा अमृतानुभव लाभू शकतो; त्यामुळे ईश्वरसंग सोडू नये, हा या अभंगाचा उपदेशात्मक अर्थ त्यांनी उलगडून सांगितला.

ह.भ.प. साहेबराव महाराज टाकळकर यांनी आपल्या अभंगातून भक्ती, प्रेम आणि अंतःकरणातील समाधान यांचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यात्म हे जीवनाला योग्य दिशा देणारे असून, त्यातूनच खरे सुख प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानेश्वर वाल्हेकर, प्रविण वाल्हेकर, चंद्रहास वाल्हेकर, मिलिंद वाल्हेकर,पोपट शिवले,राजाराम वाल्हेकर,भरत शिवले,तुषार वाल्हेकर, प्रशांत वाल्हेकर, शुभम वाल्हेकर, यांनी केले. नाना शिवले यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
महोत्सवामुळे वाल्हेकरवाडी परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते.