महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी कबुली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस आणखी काय म्हणाले ? याबाबत आपण जाणून घेऊ या.
नागपुरातील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ऑन्कोलॉजी बियॉन्ड बॉर्डर्स ही संकल्पना स्वतःच सर्व काही सांगते. कोणताही आजार किंवा आरोग्य समस्या कोणत्याही सीमा, दर्जा किंवा भौगोलिक मर्यादा ओळखत नाही. म्हणूनच आजच्या परस्पर जोडलेल्या जगात आपण एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणे आवश्यक आहे.”
गेल्या दशकात कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढत आहे. संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढ्यात भारताने यश मिळवले असले तरी कर्करोग हे आरोग्य व्यवस्थेसमोर मोठे आव्हान ठरत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार पुढील १५ ते २० वर्षांत कर्करोगाचे प्रमाण ७५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत रुग्णसंख्येत ११ टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
आता केवळ उपचार नव्हे तर प्रतिबंधात्मक उपायांवरही भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संशयित रुग्णांचे तपासणी साधनसामग्री, कार्यपद्धती आणि लवकर निदानाची क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
एनसीआय सारख्या संस्थांमुळे केवळ मध्य भारतातीलच नव्हे तर परदेशातील रुग्णांनाही सेवा मिळत असून, अस्थी मज्जा प्रत्यारोपण सारख्या अत्याधुनिक प्रक्रिया येथे होत आहेत, असे त्यांनी सांगितले. राज्यात अशा आणखी संस्थांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र शासनाने ‘महा कॅन्सर केअर फाउंडेशन’ या कलम ८ कंपनीच्या माध्यमातून ‘हब अँड स्पोक’ मॉडेलवर आधारित कॅन्सर ग्रिड उभारण्याचा उपक्रम सुरू केला आहे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत उपचार पोहोचवणे हा त्यामागील उद्देश आहे.













































