केंद्र सरकारला मीच पहिलं पत्र लिहिलं होतं की या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
7

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नसून घातपातच आहे, असा त्यांचा दावा असून याबाबत त्यांनी काल (१० फेब्रुवारी) सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेत आज महापौर पदाची निवड झाली, यावेळी ते मुंबई महापालिकेच्या सभागृहात हजर होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवारांनी काही प्रश्न उपस्थित करून म्हटलंय की, “मला सामान्य व्यक्ती म्हणून ज्याचं कुठलंच टेक्निकल बॅकग्राउंड नाही, असं वाटतं की हा अपघात नाही. यामध्ये शंभर टक्के घात असू शकतो. हीच माहिती आम्हाला सर्व तपास यंत्रणांकडून हवी आहे. हा अपघात होता की घात होता? म्हणजेच माझी आणि महाराष्ट्रातील असंख्य लोकांची शंका आहे की हा घात होता”, असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांच्या या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं.

तपास यंत्रणांकडून सखोल तपासणी होणार

त्यावर ते म्हणाले, “मी रोहित पवारांची पीसी पाहिली नाही. पण त्याविषयी थोडंफार माहितेय. कोणाच्याही मनात काही शंका असेल तर त्याचं निरसन झालं पाहिजे. आपल्याकडे अनेक तपासयंत्रणा उपलब्ध आहेत. या तपासयंत्रणांकडून सखोल तपास होणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने चौकशी सुरू झाली आहे. डीजी सेफ्टी महत्त्वाची तपासणी असते, ती सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. कोणाच्याही मनात काही शंका असेल तर त्यांचं निरसन झालं पाहिजे.”

“केंद्र सरकारला मीच पहिलं पत्र लिहिलं होतं की या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. यात ज्या ज्या चुका झाल्या आहेत, त्या चुका सुधारून आपण आपल्या एव्हिएशनला आणि सामान्य नागरिकांना सुरक्षित ठेवू शकू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.