“मोरया हॉस्पिटलच्या उभारणीत मामनचंद आगरवाल यांचे योगदान इतके मूलभूत आहे की, ते नसते तर आज मोरया हॉस्पिटलची इमारत उभी राहिलीच नसती,” असे ठाम आणि भावनिक विधान मोरया हॉस्पिटलचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी केले. मामनचंद आगरवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक, सद्गुरु जंगली महाराज बँकेचे संस्थापक अध्यक्ष तसेच नामवंत उद्योजक असलेल्या मामनचंद आगरवाल यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक कर्मकांड व विधी टाळून सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यांच्या प्रगतिशील विचारांनुसार मोरया हॉस्पिटलला आर्थिक मदत देत सेवा आणि माणुसकीच्या माध्यमातून त्यांना आगळीवेगळी आदरांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमास मोरया हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद पंडित, कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश बोराडे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मुकुंद डोग्गीकर, पॅथॉलॉजिस्ट डॉ. ज्योती कोराडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. नीलिमा अमृते, आयुर्वेद विभागप्रमुख डॉ. वेंकटेश धर्माधिकारी, आयुर्वेदाचार्य डॉ. उदय जोशी, ओरल सर्जन डॉ. अमित नेमाने उपस्थित होते. यासह सामाजिक कार्यकर्ते संजय कुलकर्णी, कामगार प्रतिनिधी व विश्वस्त भगवान तांबे तसेच मोरया हॉस्पिटलच्या व्यवस्थापिका सारिका मोरे यांचीही उपस्थिती होती.
यावेळी अध्यात्मिक गुरु सूरजभान, तसेच मामनचंद आगरवाल यांच्या पत्नी गंगादेवी एम. आगरवाल, भाऊ चंद्रभान सी. आगरवाल (गर्ग), भावजय निर्मला चंद्रभान आगरवाल गर्ग, लता रामकुमार आगरवाल, पुत्र सुरेश मामनचंद आगरवाल, राजेश मामनचंद आगरवाल, कन्या उषा मोहन गुप्ता, पुष्पा जितेंद्र आगरवाल, मीना सोमेश गुप्ता यांच्यासह संपूर्ण आगरवाल परिवार उपस्थित होता.
डॉ. अविनाश वाचासुंदर पुढे म्हणाले, “१९८२ पासून मामनचंद आगरवाल यांचा मोरया हॉस्पिटलशी अतूट संबंध होता. आम्ही सर्व डॉक्टर सेवाभावी वृत्तीने काम करत होतो, या एकाच विश्वासावर त्यांनी जंगली महाराज बँकेच्या माध्यमातून हॉस्पिटलसाठी कर्ज उपलब्ध करून दिले. कोणताही मान-सन्मान किंवा पदाची अपेक्षा न ठेवता त्यांनी संस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर आम्हाला आधार दिला.”
मामनचंद आगरवाल यांचे कार्य केवळ सामाजिक व आरोग्य क्षेत्रापुरते मर्यादित नव्हते. ते सत्संग भवन जिंदराम गुरु का रहानी आश्रमाचे संस्थापकही होते. या आश्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, सद्विचार आणि जीवनमूल्यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आपले तन, मन आणि धन अर्पण केले. समाजातील सर्वसामान्य माणसाला सत्संगाचे महत्त्व समजावे, आत्मचिंतनाची जाणीव निर्माण व्हावी यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले.
कार्यक्रमात मोरया हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला आणि हॉस्पिटलसाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी अध्यात्मिक गुरु सूरजभान यांच्या मार्गदर्शनाखाली भजन व सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मोरया हॉस्पिटलच्या उभारणीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपती शास्त्री व ज्येष्ठ प्रचारक तात्या बापट यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. त्यांच्या विचारांनी सेवाभावी रुग्णालय उभारण्याचा संकल्प अधिक बळकट झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.
मामनचंद आगरवाल यांचे विचार अत्यंत प्रगतिशील होते. कर्मकांड व अंधश्रद्धांना त्यांनी कधीही थारा दिला नाही. आयुष्यभर अंधश्रद्धांविरोधात काम करत त्यांनी माणुसकी, विवेक आणि समाजहित यांना सर्वोच्च स्थान दिले. त्यामुळेच त्यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त कोणतेही धार्मिक विधी न करता सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक आणि आर्थिक क्षेत्रात ठसा उमटवणारे मामनचंद आगरवाल हे केवळ यशस्वी उद्योजक नव्हते, तर विचारांनी आणि कृतीने समाज घडवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जीवनकार्याचा वारसा पुढे नेणारा हा प्रथम स्मृतीदिन कार्यक्रम उपस्थितांच्या मनाला भावून गेला.










































