पिंपरी, ता. ६ : चिंचवड येथील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या दोन दिवसीय वर्धापनदिनाला शुक्रवारी (ता. ६) उत्साहात सुरवात झाली. पहिल्या दिवशी स्मरणिका प्रकाशन. तुकाराम चिंचणीकर यांचे ‘ वंदे मातरम ‘ या विषयावर व्याख्यान आणि सभासदांचा ‘ वंदे मातरम ‘ य संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीत गायन असे विविध कार्यक्रम उत्साहात झाले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर आणि त्यांचे शिष्य प्रमुख पाहुणे यादवराव शिंदे आणि जिजाराम शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संघाचे सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. यावेळी व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजू गोलांडे, व्याख्याते तुकाराम चिंचणीकर यांच्यासह संघाचे उपाध्यक्ष अशोक नागणे आदी उपस्थित होते. यावेळी संघाच्या सभासदांची संख्या लक्षणीय होती. यावेळी स्मरणिकेचे संपादक माधव जोशी, उपसंपादक अश्विनी कोटस्थाने यांच्यासह संपादकीय मंडळातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रसिद्ध व्याख्याते तुकाराम चिंचणीकर यांच्या हस्ते आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचा उत्साह सर्व सभासदांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
प्रमुख पाहुणे जिजाराम शिंदे म्हणाले, ” तुम्ही जितके निरिच्छ व्हाल, तितके जास्त समाधान तुम्हाला मिळेल. मित्र, नातेवाईक आदींसाठी सर्वकाही करा , परंतु त्याबदल्यात कोणाकडून काही अपेक्षा करू नका. अपेक्षा केली नाही कि पश्चातापाचे दु:ख होत नाही, हे मी स्वतः आचरणात आणतो.”
‘ वंदे मातरम ‘ या विषयावर बोलताना व्याख्याते तुकाराम चिंचणीकर म्हणाले, ” आनंद हा शब्द वेदांमध्ये ब्रह्म या अर्थाने वापरला आहे. कोणताही समाज नष्ट करायचा असेल तर त्यांची शिक्षण पद्धती नष्ट करायला हवी, हे ब्रिटिशांनी जाणले. त्यामुळेच त्यांनी आपली शिक्षण पद्धती नष्ट केली. आपण भारतीय आहोत याची लाज वाटावी, अशी शिक्षण पद्धती ब्रिटिशांनी निर्माण केली. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये उठाव झाला, त्याचे कारण बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले ‘ वंदे मातरम ‘ हे राष्ट्रगान होय. हे राष्ट्रगान म्हणजे देशाचे वर्णन आहे. १९०५ मध्ये प्रथम ‘ वंदे मातरम ‘ चे जाहीर गायन झाले. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी ‘ वंदे मातरम ‘ गायले जाऊ लागले. ‘ वंदे मातरम ‘ म्हणणाऱ्या नागरीकांवर ब्रिटिश लाठीमार करीत असत. ‘ एकाच दिवसात देशवासियांना राष्ट्रधर्माची दीक्षा देणारे गीत, ‘ असा या गीताचा योगी अरविंद यांनी उल्लेख केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिव रवींद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्याध्यक्ष प्रिया जोशी यांनी सूत्रसंचालन केले.










































