दि.०७(पीसीबी)- राज्यभरात आज जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रांवर नागरिकांनी गर्दी केली आहे. एकीकडे मोठ्या उत्साहात मतदान पार पडत असताच पुण्यामधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पतीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजकीय वातावरण जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमालीचे तापले असून, आंबेठाण पाईट गटात एका भीषण घटनेने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सुनिता बुट्टे यांचे पती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्यावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बुट्टे पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वासुली फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
काही दिवसांपूर्वीच शरद बुट्टे पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शनिवारी ते आपल्या खासगी कामानिमित्त बाहेर गेले असताना, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी ते अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
परिसरात तणाव..
या हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे हिंसाचार होणे, हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.










































