भाजपचा वारसा सांगणाऱ्या महापौर रवी लांडगेंचा आजवरचा प्रवास

0
5

दि.०६(पीसीबी)-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवि बाबासाहेब लांडगे यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे भोसरी परिसरासह संपूर्ण शहरात समाधान व्यक्त केले जात आहे.१५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी (ता. हवेली, जि. पुणे) येथे जन्मलेल्या रवि लांडगे यांनी डी. फार्मसी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना अवगत आहेत. शेती, उद्योग व बांधकाम हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते विवाहित असून त्यांच्या पत्नी श्रद्धा रवि लांडगे या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांना एक मुलगा आहे.

राजकारणात सक्रिय असलेले रवि लांडगे यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सन २०१७ ते २०२२ या कालावधीत ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे बिनविरोध नगरसेवक होते. नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागातील तसेच भोसरी विधानसभा मतदारसंघातील अनेक नागरी समस्या मार्गी लावल्या. भोसरीतील २०० खाटांच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात त्यांनी जनआंदोलन उभे करून तो निर्णय मागे घेण्यास भाग पाडले.

सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. ते आनंद ग्रुप, पुणेचे संस्थापक अध्यक्ष असून कै. अंकुशराव लांडगे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर युवा क्रांती मित्र मंडळ, तसेच शिव गणेश मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. गेल्या २५ वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन, दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच महिलांसाठी शिवणकला, पाककला व उद्योजकतेचे प्रशिक्षण देणारे उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत. क्रीडा व कला क्षेत्रातही ते सक्रिय असून नियुद्ध कराटे आणि मार्शल युद्ध संघाचे अध्यक्ष आहेत. कराटे स्पर्धा, दिवाळी पहाट, होम मिनिस्टर कार्यक्रम, पुणे फेस्टिव्हल तसेच भोसरीतील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतींचे आयोजन त्यांनी केले आहे.

भाजपाचा राजकीय वारसा
रवि लांडगे यांना राजकीय वारसा लाभलेला आहे. त्यांचे वडील कै. बाबासाहेब आनंदराव लांडगे आणि चुलते कै. अंकुशराव आनंदराव लांडगे हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व भाजपचे शहराध्यक्ष होते. २००७ मध्ये चुलत्यांच्या दुर्दैवी हत्येनंतर अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत सार्वजनिक जीवनात सक्रिय भूमिका घेतली. नवनिर्वाचित महापौर म्हणून रवि लांडगे यांच्याकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भक्कम नेतृत्व मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे