महापौरपदी रवी लांडगे, उपमहापौर शर्मीला बाबर बिनविरोध

0
3

दि.०६(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहराच्या सत्तावीसाव्या महापौरपदी भाजपचे रवि लांडगे यांची आज (शुक्रवारी) बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने महापौरपदासाठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपहापौरपदी भाजपच्या शर्मिला बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली.

महापौर, उपमहापौरपदासाठी सोमवारी (२ फेब्रुवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. भाजपकडून प्रभाग ६ धावडेवस्तीमधून दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेल्या रवि लांडगे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचा एकमेव अर्ज होता. त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. उपमहापौरपदासाठी निगडी, प्राधिकरणाचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या भाजपच्या शर्मीला बाबर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केवळ उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आकुर्डीचे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वैशाली काळभोर यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

महापाहापौर-उपमहापौरपदासाठी आज शुक्रवारी (६ फेब्रुवारी) निवडणूक प्रक्रिया झाली. सकाळी ११ वाजता नवनिर्वाचित नगरसेवकांची विशेष सभा पार पडली. महापौरपदासाठी रवि यांचा एकमेव अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी असलेले सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी रवि यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी माघारीच्या मुदतीत माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. रवि लांडगे २७ वे महापौर तर शर्मिला बाबर याही २७ व्या उपमहापौर झाल्या आहेत.भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे हे महापालिकेचे पहिले महापौर झाले होते. त्यांनी २७ मार्च १९८६ ते १९ मार्च १९८७ असे वर्षभर महापौरपद भूषवले. ते काँग्रेसकडून निवडून आले होते. त्यानंतर पिंपरीगावातील भिकू वाघेरे पाटील, सांगवीतील नानासाहेब शितोळे, आकुर्डीतील कृष्णा उर्फ तात्या कदम, पिंपरीतील कविचंद भाट, पिंपळेसौदागर येथील सादबा उर्फ अप्पासाहेब काटे, पिंपळेनिलख येथील प्रभाकर साठे, निगडीतील आझम पानसरे, भोसरीतील विलास लांडे, फुगेवाडीतील रंगनाथ फुगे, पिंपरीगावातील संजोग वाघेरे पाटील, निगडीतील आर. एस. कुमार, चिंचवडमधील अनिता फरांदे, नेहरुनगर येथील हनुमंत भोसले काँग्रेसकडून महापौर झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महापौर होण्याचा मान निगडी गावठाणातील मधुकर पवळे यांना मिळाला होता. त्यानंतर पिंपळेगुरव येथील लक्ष्मण जगताप, खराळवाडीतील प्रकाश रेवाळे, संभाजीनगरमधील मंगला कदम, नेहरुनगरमधील डॉ. वैशाली घोडेकर, चिंचवडमधील अपर्णा डोके, संत तुकारामनगर मधील योगेश बहल, भोसरीतील मोहिनी लांडे, पिंपळेगुरव येथील शकुंतला धराडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर झाल्या होत्या.

भाजपचा पहिला महापौर होण्याचा मान च-होलीतील नितीन काळजे यांना मिळाला. त्यानंतर चिखलीतील राहुल जाधव, सांगवीतील उषा ढोरे यांनी भाजपकडून महापौरपद भूषवले. ढोरे यांनी २२ नोव्हेंबर २०२९ ते १३ मार्च २०२२ या कार्यकाळात महापौरपद भूषविले. आता भाजपचे चौथे महापौर म्हणून रवि लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महापौर झालेले ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, दिवंगत लक्ष्मण जगताप हे तिघे आमदार झाले. शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे हे हवेली तालुक्याचे आमदार झाले होते. तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघातून २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि २००९ मध्ये भोसरीतून विलास लांडे अपक्ष आमदार झाले होते. लक्ष्मण जगताप हे विधानपरिषदेवर अपक्ष निवडून गेले होते. त्यानंतर २००९ मध्ये चिंचवडमधून अपक्ष विधानसभेवर निवडून गेले. २०१४, २०१९ मध्ये भाजपकडून निवडून गेले होते. आझम पानसरे, संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभेची तर, मंगला कदम, हनुमंत भोसले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पण, चौघांनाही अपयश आले.