मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावरअडकलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्याकडून मदतीचा हात

0
3

दि.०४(पिसीबी):मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, अपघाताला २४ तास उलटूनही अद्याप वाहतूक पूर्णपणे सुरळीत झालेली नाही. सध्या या द्रुतगती महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे.

मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. परिणामी द्रुतगती महामार्गासह जुना पुणे–मुंबई मार्गही बंद ठेवण्यात आला.

या अपघातामुळे तब्बल २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून, अनेक प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले आहेत. या कोंडीत रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला व पुरुष अशा सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांनी तात्काळ मदतीचे निर्देश दिले. त्या स्वतः दुःखात असताना देखिल समाजाप्रती त्यांची अजित दादांसारखीच तळमळ काळजी डोळ्यासमोर उभी राहिली .

ही मदत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, माजी नगरसेविका व स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा ताई सावळे यांच्या मार्फत अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.

सीमा ताई सावळे यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रवाशांची आपुलकीने विचारपूस केली. तसेच अडकलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, नाश्त्याची आणि आवश्यक प्राथमिक मदतीची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. संकटाच्या काळात नागरिकांना मानसिक आधार देत त्यांनी त्यांना धीर दिला.

या मदतकार्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली आणि सीमा ताई सावळे यांच्या तत्पर व जबाबदार कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी नागरिकांच्या पाठीशी उभे राहतात, याचे हे जिवंत उदाहरण ठरत आहे.