Home Pimpri अजितदादा हे सामान्य माणूस आणि पत्रकारांप्रती संवेदना असलेले नेते होते

- नंदकुमार सातुर्डेकर यांचे प्रतिपादन
पिंपरी, दि. २ : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची बारीक माहिती, मिस्कील तितकाच स्पष्ट वक्ता स्वभाव, जनसामान्यांमध्ये मिसळणारे दादा आपल्यातून गेले यावर विश्वासच बसत नाही. सामान्य माणूस आणि पत्रकारांप्रती संवेदना असलेला नेता आपल्यातून गेला आहे. अशा भावना ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजलीपर सभेत व्यक्त केल्या. पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रा रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातुर्डेकर यांनी अजितदादांच्या अनेक पैलूंचे दर्शन घडवले.
जनसामान्यांमध्ये मिसळणारा नेता म्हणून मला नेहमीच अजित पवार यांचे अप्रूप वाटत आले असे सांगून सातुर्डेकर म्हणाले की, मंत्री आले की प्रचंड सुरक्षा व्यवस्था असते. मात्र ही सुरक्षा झुगारून देऊन जनसामान्यात मिसळणारा नेता अशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख होती. वेळोवेळी पिंपरी चिंचवड शहरवासीयांना याचा प्रत्यय आला.सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटणारा नेता अशी अजित पवार यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची जन सन्मान यात्रा निगडीत आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंक रिक्षातून प्रवास केला. पुरुषांपेक्षा महिला स्मूथ रिक्षा चालवतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावेळी महिला रिक्षाचालकांच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान असाधारण असे होते. असे सातुर्डेकर म्हणाले. सन 1992 मध्ये बारामती लोकसभा मतदार संघातून विजयी झाल्यापासून अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचे नेतृत्व केले. तत्कालीन महापौर विलास लांडे, मंगलाताई कदम यांच्या काळात अजितदादांशी जवळून भेटता आले. पत्रकार व कार्यकर्ता म्हणून त्यांना अनेकदा भेटलो. शहरात भेटी दरम्यान त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न नेहमीच ऐकून घेतले. कोणीही साधी चिठ्ठी दिली तरी भाषणात ते त्याचा उल्लेख करायचे आणि तो प्रश्न तडीस नेण्याची आश्वासन देऊन पूर्णही करायचे. वैयक्तिक प्रश्नाबाबत तो अर्ज स्वीय सहाय्यकाकडे देऊन प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करायचे. एखादे काम होणार नसेल तर तोंडावरच सांगून टाकायचे. पत्रकारांप्रती अजितदादा अतिशय संवेदनशील होते असे सांगताना सातुर्डेकर म्हणाले की पत्रकारांनी आडवेतिडवे आणि टार्गेट करणारे प्रश्न विचारले की दादा अचूक ओळखायचे. ‘एक मिनिट’ म्हणत.. त्या पत्रकाराला थांबवत चिडायचे सुद्धा. पण शहरातील पत्रकारांप्रती अजित पवार यांची संवेदनशीलता वेळोवेळी दिसून आली.
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकल्याच्या प्रकारानंतर पिंपरी चिंचवड मध्ये कोणी मंत्री आल्यानंतर पत्रकारांना त्यांची भेट घेणे मुश्किल झाले होते. त्यामुळे विशेषतः वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांची कोंडी झाली होती. याबाबत प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे पत्रकारांनी अजित पवार यांची भेट घेतली असता त्यांनी पोलीस आयुक्तांना बोलवून आम्ही आल्यानंतर पत्रकारांशी बोलायचं का नाही ते ठरवू, पण त्याआधी तुम्ही त्यांना अडवू नका असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरीतील खराळवाडी येथील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी अनेक पत्रकारांचे खिसे तपासले गेले. बॅगा तपासल्या गेल्या. त्याबाबत नापसंती व्यक्त करत पत्रकारांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल आणि माजी उपमहापौर डब्बू आसवाणी यांनी दादांच्या कानावर ही गोष्ट घातली. तेव्हा दादा स्वतः पत्रकारांकडे आले. ‘दादा,आपण मागे पोलीस आयुक्तांना आदेश देऊनही पत्रकारांना त्रास दिला जात आहे ‘याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता ‘पोलिसांनी असे करणे अतिशय चुकीचे आहे, मी जेव्हा येणार असेल तेव्हा असे अजिबात चालणार नाही असे आदेश देतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतो.’ असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. ‘दादा तुम्ही विरोधी पक्षातच बरे होतात यांना थोडा वचक होता’ अशी कमेंट केली असता ‘नाही आता मी देवेंद्रला सांगून गृहमंत्री पदच माझ्याकडे घेतो ‘अशी मिस्कील टिपणी त्यांनी केली. अशी आठवण सातुर्डेकर यांनी सांगितली राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असतानाचा एक किस्सा सांगताना सातुर्डेकर म्हणाले की, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर आझमभाई पानसरे हे काँग्रेसच्या वाटेवर होते. त्यांना थांबविण्यासाठी राष्ट्रवादीने ग्राहक कल्याण सल्लागार समिती अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. त्यावेळी त्यांच्यासोबत मी आणि ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर मंत्रालयात गेलो होतो. पानसरे हे आग्रह करत असतानाही आम्ही बाहेरच थांबलो. पानसरे यांनी पुष्पगुच्छ देऊन अजित पवार यांचा सत्कार केला. त्यावेळी अजितदादा यांनी ‘आपण कोण कोण आला आहात ?’ असे पानसरे यांना विचारले.त्यावर त्यांनी ‘सातुर्डेकर आणि भडसाळकर दोन पत्रकार माझ्यासोबत आले आहेत’ असे सांगितले. त्यावर अजितदादांनी शिपाई आणि क्लार्कला सांगून आम्हास बोलून घेतले. दादांच्या कार्यालयात गेल्यावर ‘अरे पत्रकार मित्रांनो, एवढे का आपले संबंध दुराव्याचे आहेत, तुम्ही इतक्या लांब घेऊन बाहेरच थांबलात.’ असे प्रेमाचा ओलावा असणारे उद्गार त्यांनी काढले. त्यावर ‘दादा शहरात आलात की आपण भेटतोच.तुम्हाला आणि आझमभाईंना काही बोलायचे असेल म्हणून बाहेर थांबलो’ असे मी म्हणालो. त्यावर ‘माझे आत आणि बाहेर वेगळे काहीच नसते’ असे अजितदादा म्हणाले. आमच्याशी बोलत बोलत त्यांनी पाच मिनिटात अनेक फायलींचा निपटारा केला .
‘दादा पाच मिनिटात किती फायलींचा निपटारा केलात’ मी म्हणालो. त्यावर अजितदादा हसत म्हणाले,’ हा आमचा मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा नुसता घाबरतो नुसता घाबरतो, फायलींवर सह्या करायच्या म्हटले की याच्या हाताला लकवा भरतो. लोकांची काम करताना इतकं काय घाबरायचं मला कळत नाही’ असं पटकन दादा बोलून गेले. परत जीभ चावत ‘मी खरंतर ठरवतो वंगाळ बोलायचं नाही पण तोंडातून शब्द जातात .’ असे म्हणत ते दिलखुलासपणे हसले. त्यांचा हा मनमोकळा स्वभाव नेहमीच काही ना काही बातम्या देऊन जायचा. म्हणूनच अजितदादा आले की पत्रकारांच्या उड्या पडायच्या. हमखास चांगली काही ना काही बातमी देणारे दादा आता कधीच भेटणार नाहीत ही वेदना पत्रकारांच्याही अंतःकरणात आहे. अशा भावना सातुर्डेकर यांनी व्यक्त केल्या.