दि.१७(पीसीबी)-पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणावर तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या नातेवाईक तरुणावर देखील तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे निलख येथील डीपी रोडवर शनिवारी (१३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली.
कार्तिक संतोष बालवडकर, अनिष्ट शरद मुरकुटे अशी जखमी तरुणांची नावे आहेत. संतोष जनार्दन बालवडकर (४७, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ऋषिकेश पाटील (२५), अभिषेक भासके (१८), जय शिंदे (१८, सर्व रा. पिंपळे निलख) यांना अटक केली आहे. त्यांच्यासह दोन अल्पवयीन बालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचा मुलगा कार्तिक याने आरोपींकडे पाहिल्याच्या कारणावरून अल्पवयीन बालकाने आणि ऋषिकेश पाटीलने वाद घातला. त्यानंतर जय शिंदे व अभिषेक भासके यांनी तलवारीने आणि रॉडने कार्तिकच्या डोक्यात व कानावर वार केले. भांडण सोडवणाऱ्या अनिश मुरकुटे यालाही उलट्या तलवारीने मारहाण करत गंभीर जखमी केले. आरोपींनी हवेत हत्यारे फिरवून ‘आम्ही येथील भाई आहोत’ असे म्हणत दहशत निर्माण केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
