पीएमआरडीएमुळे पुणे शहराचा विकास – मुख्यमंत्री फडणवीस

0
970

महाळुंगे, दि. १६ (पीसीबी) – पुणे जिल्ह्यातील महाळुंगे माण हाय – टेक सिटी नगररचना योजना क्र. १ या प्रकल्पाचे भूमिपूजन आज (शुक्रवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट,समाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीचे आयुक्त किरण गीते, आमदार मेधा कुलकर्णी तसेच आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे शहराचा रिंगरोडचा प्रश्न मागील कित्येक वर्षापासून प्रलंबित असताना, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता येताच पीएमआरडीए (pmrda) ची स्थापना करण्यात आली. त्या नंतर रिंगरोडच्या कामाला वेग आला असून  हा रिंगरोड पुणे शहराच्या विकासाला आधिक गती देणारा ठरणार आहे. तसेच रिंगरोड चा पहिला टप्पा ३२ किलोमीटर चा असून त्याला देखील गती देण्याचे काम केले आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून अनेक काम केले जात असून आता पीएमआरडीएची गाडी सुसाट सुटली आहे.

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर मेट्रो आणि अनेक समस्या चे काय होणार असा विरोधकांनी अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र भाजपाने राज्यातील आणि पुणे शहरातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे शहराचा मेट्रोचा प्रश्न मार्गी लावला आहे.