विनोद तावडे खासगीत शिक्षक प्राध्यापकांना चोर म्हणतात-अजित पवार

660

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – शिक्षण मंत्री विनोद तावडे शिक्षक प्राध्यापकांना खासगीत चोर म्हणतात असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. एवढेच नाही तर संस्थाचालक दरोडेखोर आहेत असेही त्यांनी मला खासगीत सांगितल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भात सध्याचे सरकार उदासीन आहे हे सांगत असतानाच अजित पवार यांनी हा आरोप केला आहे. बारामती या ठिकाणी मु.सा. काकडे महाविद्यालयाच्या आर. एन. शिंदे सभागृह बहुउद्देशीय इमारतीचा पायाभरणी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

काही शिक्षण संस्थांनी शिक्षणाचे बाजारीकरण केलं, तर काही चुकीच्याही वागल्या असतील. चुकीच्या संस्थांवर तुम्ही आक्षेप घ्यायला काहीही हरकत नाही. पण ज्या संस्था चांगल्या आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्या अडचणी दूर करा. मात्र खासगीत माझ्याशी बोलताना विनोद तावडे यांनी अनेकदा शिक्षक आणि प्राध्यपाकांना चोर म्हटले आहे तर संस्थाचालकांना दरोडेखोर म्हटले आहे. काही लोक चुकत असतीलही पण सगळ्यांना एकाच फूटपट्टीने मोजणे योग्य नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

याच वेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरूनही मिश्कील टीका केली. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे तुम्ही सुरु केला, उरलेलं काम आम्ही पूर्ण केले आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असे नावही देऊन टाकले. आता समृद्धी महामार्गाच्या नावावरून तुम्ही बसा भांडत त्याचे नामकरण आम्हीच करणार असे म्हणत महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.