विमान, हेलिकॉप्टर अपघात मृत नेते

0
3

पूर्ण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला आहे. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत होते. लँडिंग करताना विमान अचानक क्रॅश झाले. घडलेला अपघात एवढा भीषण होता की विमानाला आग लागली होती. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, विदीप जाधव, पिंकी माळी यांचा मृत्यू झालाय. देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात तीन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराव मेहता
यांचे विमान पाकने युद्धात पाडले
बलवंतराव मेहता हे थोर स्वांतत्र्यसेनानी होते. ते गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते. मुख्यमंत्री बलवंतराव मेहता हे 19 सप्टेंबरला विमानाने मिठापूर येथून कच्छला चालले होते. त्यांच्याबरोबर पत्नी, तीन कार्यकर्ते, पत्रकार होते. त्याचवेळी पाकच्या वायूसेनेच्या विमानाने मेहता हे प्रवास करत असलेल्या विमानावर हल्ला केला. त्यात मेहता यांच्यासह सर्वजणांचा मृत्यू झाला.

संजय गांधी यांचे ‘ते’ उड्डाण शेवटचे ठरले
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र व काँग्रेसचे नेते संजय गांधी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी हे वैमानिक होते. त्यांना विमान उडविण्याचा छंद होता. 23 जून 1980 रोजी संजय गांधी यांनी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावरून पिट्स एस 2 ए हे विमान उडविले. त्यांच्याबरोबर कॅप्टन सक्सेना हेही होते. आकाशात विमानाने अचानक तीन लूप घेतल्यानंतर चौथा लूपला विमानाचे इंजिन बंद पडले. त्यावेळी संजय गांधी हेच विमान चालवत होते. त्यानंतर काहीच क्षणात विमान जमिनीवर कोसळले. त्यात संजय गांधी आणि कॅप्शन सक्सेना या दोघांचाही मृत्यू झाला.

माधवराव शिंदे यांचे विमान कोसळले
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते माधवराव शिंदे-सिंधिया यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. माधवराव शिंदे हे 30 सप्टेंबर 2001 रोजी हे एका छोट्या विमानाने उत्तर प्रदेशातील कानपूरला राजकीय सभेसाठी जात होते. त्यांच्या विमानात काही पत्रकारही होते. उत्तर प्रदेशमध्येच त्यांचे विमान कोसळले होते. विमानाचा स्फोट झाल्याने मृतदेह ओळखता येत नव्हते. माधवराव शिंदे यांच्या गळ्यातील लॉकेटवरून त्यांची ओळख पटविण्यात आली.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर यांचे हेलिकॉप्टर कोसळले
आंध प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा पदावर असताना हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीचे बेल 430 हेलिकॉप्टर मुख्यमंत्री वायएसआर हे वापरत. 2 सप्टेंबर 2009 रोजी वायएस राजशेखर रेड्डी यांच्याबरोबर आणखी तिघे चित्तूर जिल्ह्यातील एका गावाकडे हेलिकॉप्टरने जात होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नल्लामलाच्या घनदाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात वायएस राजशेखर रेड्डी यांच्यासह पायलट व चार जण असा पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरचे अवशेष व मृतदेह आढळून आले. वायएसआर रेड्डी हे 2004 ते 2009 काळात दोनदा मुख्यमंत्री झाले होते. ते जनतेच्या गळ्यातील ताईत होते. वायएसआर यांचा मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दुख: झाले. त्यात अनेकांना ह्दयविकाराचा झटका आला तर काहींनी आत्महत्या केल्या. त्यावेळी तब्बल 122 जणांचा मृत्यू झाला होता. ऐवढे ते लाडके मुख्यमंत्री होते.

अरुणाचल प्रदेशने मुख्यमंत्री गमाविले !
अरुणाचल प्रदेशने हेलिकॉप्टर अपघातात विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असे दोघे गमविले आहेत. 30 एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागला. 30 एप्रिल रोजी सकाळी ते हेलिकॉप्टरने तवांगहून इटानगरला जात होते. हेलिकॉप्टर टेकऑफ झाल्यानंतर वीस मिनिटामध्ये सेला खिंडीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश. पवण हंस कंपनीचे हेलिकॉप्टर 13,000 हजार फूट उंचीवरून उडत होते. हे हेलिकॉप्टर शोधण्यासाठी चार दिवस लागले होते. 4 मे रोजी लष्करी पथकाला जंगलात दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले. त्यात खांडू यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.

ओपी जिंदल आणि सुरेंद्र सिंह
प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जामंत्री ओपी जिंदल आणि कृषीमंत्री सुरेंद्र सिंह 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले. त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला होता. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता.

लोकसभा अध्यक्ष बालयोगीही अपघातानेच हिरवले
तेलुगू देसम पक्षाचे नेते आणि लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचाही अपघातातच मृत्यू झाला. 3 मार्च 2002 रोजी एका खाजगी हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोवादलंका गावात आपत्कालीन लँडिंगदरम्यान बालयोगी यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

विजय रुपाणी यांचा अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे गेल्या वर्षी अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झाला होता. अहमदाबाद येथे 12 जून 2025 रोजी एअर इंडियाचे विमान कोसळले होते. त्यात 260 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. रुपाणी हे लंडन येथे कुटुंबाला भेटायला जात होते. त्याचवेळी विमान अपघातात त्यांचा मृत्यू झालाय.

विमान अपघातात मृत्यू झालेले बलवंतराय मेहता, डोरजी खांडू आणि वाई राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्रीपदावर होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर असताना त्यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय.