महापौर पदाच्या आरक्षणासाठी गुरुवारी सोडत; पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण होणार?

0
100

दि.२० (पीसीबी)-बहुमत मिळाल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेचा महापौर भाजपाचाच होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण जाहीर होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.राज्यातील २९ महापालिकांमधील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दिनांक २२ रोजी सकाळी ११ वाजता, मंत्रालय मुंबई येथील परिषद सभागृह, सहावा मजला येथे काढण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (दि.१५) मतदान झाले होते, तर शुक्रवारी निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपाने १२८ पैकी ८४ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. मात्र महापौरपदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसल्याने शहरात उत्सुकता होती.

राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने सप्टेंबर २०२५ मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आजपर्यंतच्या महापौर पदाच्या आरक्षणाचा संपूर्ण तपशील, २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या माहिती आणि आरक्षणाचा कालावधी मागविला होता. त्यानुसार महापालिकेने २००१ पासूनचा सविस्तर आरक्षणाचा इतिहास शासनाकडे सादर केला आहे.

आतापर्यंत पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी खुला प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आता केवळ अनुसूचित जातीचे (एससी) आरक्षण शिल्लक राहिले असून, यावेळी महापौर पद एससी प्रवर्गासाठी आरक्षित राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आतापर्यंत महापौरपदी विराजमान झालेल्या नगरसेवकांमध्ये प्रकाश रेवाळे, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव आणि उषा ढोरे यांचा समावेश आहे.

महापौरपदाचे आरक्षण राज्याच्या नगरविकास विभागामार्फत जाहीर केले जाते. त्यामुळे गुरुवार, दिनांक २२ रोजी होणाऱ्या सोडतीकडे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.महापौर पदासाठी कोणता प्रवर्ग जाहीर होतो आणि भाजपाचा महापौर कोण असेल, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होणार आहे.