पत्नी आणि मुलगी गावी गेले असताना पोलिसाने केला आयुष्याचा शेवट

0
9

पुणे दि . ७ ( पीसीबी ) : पुण्यातील एका पोलिसाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहर पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिसाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सचिन हरीशचंद्र सुर्वे (वय ४६ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पत्नी आणि मुलगी गावी गेल्यानंतर संबंधित पोलिसांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येचा का केली, याचे कारण अस्पष्ट आहे. सध्या पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सुर्वे हे खडक पोलिस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पत्नी आणि मुलीसह शिवाजीनगर पोलिस वसाहतीत नवीन बिल्डिंग येथे वास्तव्यास होते. त्यांची पत्नी आणि मुलगी गावी गेल्याने ते सध्या एकटे घरी होते. शुक्रवारी (दि. ६) दुपारी त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यानंतर पोलिसांनी सचिन सुर्वे यांचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. सुर्वे यांच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुर्वे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली? याचा तपास पोलिस करत आहेत.