जालिंदर सुपेकरने पैसे , सोने हडपले

2 Min Read

दि . ६ ( पीसीबी ) – वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यासंदर्भात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावती तुरुंगात असलेले नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात ५५० कोटी रुपये सुपेकर यांनी मागितल्याचा आरोप वकिल निवृत्ती कराड यांनी केला आहे. तसेच, गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोने आणि रोख रक्कम जप्त करताना सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १०० ते १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोपदेखील कराड यांनी केला आहे.

भाजप आमदार सुरेश धस यांनी काल (दि.5 जून) सुपेकर यांच्यावर तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप काल केला होता. यानंतर आज (दि.6 जून) रोजी वकिल कराड यांनी सुपेकरांवर गंभीर आरोप करत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती दिली आहे.

सुरुवातीपासून या केसमध्ये काम पाहत आहेत आणि या केसमध्ये ‘रिमांड’पासून भ्रष्टाचार झाला असल्याचे कारड यांनी म्हटलं आहे. गायकवाड यांचे बँक लॉकर्स, सोनं आणि रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी १०० ते १५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला.

नानासाहेब आणि गणेश गायकवाड यांना येरवडा जेलमधून अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आले होते. अमरावतीला वर्ग केल्यानंतर, जालिंदर सुपेकर जेलचे उपमहानिरीक्षक असताना, २०२४ मध्ये त्यांनी जेलमध्ये भेट दिली, तेव्हा त्यांनी नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांना धमकावले होते. ‘मी तुम्हाला जामीन मिळवून देतो, मला ५०० कोटी रुपये द्या. हे सर्व मीच केले आहे, मीच तुम्हाला अडकवले आहे. तुम्ही मला पैसे द्या, मी पुढच्या व्यक्तींना पैसे देऊन तुम्हाला बाहेर काढून देतो. नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही,’ अशी धमकी जालिंदर सुपेकर यांनी दिल्याचा आरोप वकिल कराड यांनी केला आहे.

जालिंदर सुपेकर यांनी अमरावती कारागृहातील मिराशे, भोसले या अधिकाऱ्यांना गायकवाड पिता-पुत्राला टॉर्चर करायला सांगितले होते. मात्र, या पोलीस कर्मचाऱ्यांनी तसे केले नाही म्हणून सुपेकर यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन अमरावती कारागृहातील पाच ते सहा कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. अशी माहितीदेखील वकिलांनी दिली आहे.

Share This Article