माजी आमदार धंगेकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत

PCB Admin
2 Min Read

कसबा दि .२३ पीसीबी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालच. पण आता निवडणूक निकालानंतर महायुती अधिक बळकट होत चालली आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा महायुतीकडे ओघ वाढला आहे. दररोज महायुतीमध्ये पक्ष प्रवेश झाल्याच्या बातम्या येत आहेत. महाविकास आघाडीत सर्वात जास्त नुकसान उद्धव ठाकरे गटाच होत आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. ठाकरे गटातून बाहेर निघणारे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्या तुलनेत काँग्रेस आणि शरद पवार गटातून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे.
आता माजी आमदार आणि पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आता या भेटी संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “काल मी माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. माझं व्यक्तीगत काम होतं. कामानिमित्त मला त्यांना भेटायच होतं. पक्षात जाण्याविषयी काही चर्चा काही झाली नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
“मी शिवसेनेत जाणार नाही. आता घरात बसलोय. माझ्या कामानिमित्त भेटलो. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत, या नात्याने भेटलो” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तुम्ही पुढच्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, “माझा प्रॉब्लेम होता, म्हणून मी भेटलो. पुढच्या आठवड्यात काय, आज जाणार अशी बातमी आहे. पण मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. मला वाटलं तर उद्या मी अजितदादांना भेटेन. माझी जुनी ओळख आहे”

2024 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. या विजयासह रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाचा हिशोब चुकता केला. त्याआधी महाविकास आघाडीकडून पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी रासने यांचा पराभव केलेला.

Share This Article