अधिक माहिती अशी की, कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाइल नंबर मिळवून फिरोज शेख नावाच्या तरुणाने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले.
त्यानंतर ओळख वाढवून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून एक लाख ६९ हजार रुपयांची रोकड आणि आठ लाख २५ हजारांचे दागिने उकळले. लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने १० जानेवारीला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कोल्हापूरच्या पोलिस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत.
शेख याने २५ महिलांना गंडा घातल्याचे चौकशीत समोर आले. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत. यापूर्वी त्याच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा (Pune Crime News) गुन्हा दाखल झाला असून, काही ठिकाणी तक्रार अर्ज आहेत.