रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर

0
115
  • एकाच महिलेला किती पदे देणार?

पुणे, दि. ५ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विधान परिषदेच्या जागेवरुन अंतर्गत वाद सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना संधी देण्यास विरोध केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हात सोडून अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर रोखठोक मत मांडत चाकणकरांना उघड विरोध दर्शवला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार अजित दादा नक्कीच न्याय देतील. एकाच महिलेला किती पदे देणार? पक्षामध्ये इतरही महिला आहेत त्यांना संधी द्यावी, असं रुपाली पाटील यांनी लिहिलं आहे. रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यामुळे रुपाली पाटील विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद रंगला आहे.

रुपाली पाटील यांची खदखद काय?
रुपाली पाटील यांनी विधानपरिषदेवर रुपाली चाकणकर यांना संधी मिळण्यासंदर्भात एक बातमी फेसबुकवर शेअर करत लिहिलं आहे, की “एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे मा. अजित दादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? काल पासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत. त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा. इतर महिलांना समान संधी द्यावी. ही विनंती असेल.”