‘एकला चलो रे म्हटले पाहिजे’, मनसे कार्यकर्त्यांचा राज ठाकरेंना आग्रह

0
201

पुणे, दि. १३ (पीसीबी) : राजकारणाचा चिखल झाला आहे. कोणकोणत्या पक्षात आहे, हे सांगता येत नाही. आज विरोध करणारे उद्या मांडीला मांडी लावून बसतात. जाती, धर्माच्या नावाने एकमेकांमध्ये भांडणे लावली जातात. मतदारांचा कोणत्याही राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. हा विश्वास मतदार मनसेमध्ये बघत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाबरोबर न जाता आपण ‘एकला चलो रे म्हटले पाहिजे,’ अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मेळाव्यात घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हाध्यक्ष यांचा मेळावा शनिवारी गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. या मेळाव्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात मनसेचे काम करताना शाखा उघडताना काय-काय अडचणी आल्या, त्यावर काय उपाय केले, याची माहिती यावेळी उपस्थित सरपंचांनी दिली. ‘हिंमत केली त्याची किंमत होते,’ हे आपल्याला आजपर्यंतच्या यशावरून दिसते.

मनसेचा पदाधिकारी होण्याअगोदर तो कार्यकर्ता असतो. त्याच्याकडे पद नसले तरी तो कामे करीतच असतो. तळागाळातील प्रश्न सोडविण्यासाठी मनसे सदैव तत्पर राहत असल्यानेच पक्ष वाढत असल्याची भावना या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. पक्ष म्हणून नागरिकांना सामोरे जाताना सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. पराभवाचे धक्के सहन करावे लागले. मात्र खचून न जाता प्रयत्न करीत राहिल्याने आज यश मिळाले, असे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.

पक्षाच्या नेत्यांनी केवळ शहरी भागात लक्ष केंद्रित न करता ग्रामीण भागातही लक्ष दिले पाहिजे. यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येतो, अशी अपेक्षा उपस्थित सरपंचांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली. शहरी भागातील राजकारण वेगळे असते, तर ग्रामीण भागात काम करताना अनेक आव्हाने येतात. त्यासाठी नेत्यांनी शहर किंवा ग्रामीण असा भेदभाव न करता पक्षवाढीसाठी काय काम करता येईल, यासाठी प्रोत्साहन द्यावे, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.