खंडणीखोर, ब्लॅकमेलर तीन बोगस पत्रकारांंना अटक

2 Min Read

पुणे, दि. १३ (पीसीबी) – फोन करून आपण स्वतः पत्रकार असल्याचे सांगुन पेपरमध्ये खोटया बातम्या छापण्याची धमकी देत पोलिसांमध्ये खोटी तक्रार देवुन गुन्हयात अडकविण्याची धमकी देवुन महिन्याला हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी पुण्यातील भुषण साळवे (45), संदिप रासकर (43) आणि अक्षय वाघमारे (30) यांच्याविरूध्द लष्कर पोलिस ठाण्यात खंडणीचा (भादंवि 384, 385, 34) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजेश जनार्दन श्रीगीरी (53, रा. वेस्ट स्ट्रीट कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा दि. 15 जुलै 2023 व दि. 20 जुलै 2023 तसेच दि. 21 ऑगस्ट 2023 आणि दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी रात्री पावणे बारा वाजता कॅम्प परिसरातील वेस्ट स्ट्रीट येथे घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुषण साळवे (45) याने फिर्यादी राजेश श्रीगीरी यांना फोन करून स्वतः पत्रकार असल्याचे सांगितले. तुम्ही बालाजी सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचा क्लब चालविता व पैसे कमविता. अवैध धंदे करता. मला हप्ते चालु करा नाहीतर मी तुमच्या क्लब बद्दल पेपरमध्ये बातम्या छापणार तसेच पोलिसांकडे खोटी तक्रार देवुन गुन्हयात अडकविण्याची धमकी भुषण सावळेने श्रीगीरी यांना दिली. भुषण साळवेचा सहकारी संदिप रासकरच्या मोबाईल नंबरवर दर महिन्याला 3 हजार रूपये द्यावे लागतील असे धमकावुन 2 महिन्याचे 6 हजार रूपये त्याने घेतले. अक्षय वाघमारेने श्रीगीरी यांना प्रत्यक्ष भेटून स्वतः पत्रकार असल्याचे सांगुन श्रीगीरी यांच्याकडे दर महिन्याला हप्ता स्वरूपात पैशाची मागणी केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीगीरी हे राजकारणात सक्रिय असल्याने तसेच सतत बाहेर असल्याने व हैदराबाद या मुळ गावी गेल्याने त्यांनी पुण्यात आल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. लष्कर पोलिसांनी भुषण साळवे, संदिप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.

Share This Article