तरुणाला मारहाण करून गाडी खरेदीसाठी जमवलेले पैसे व मोबाईल हिसकावला

bpcauthor bpcauthor
1 Min Read

चिखली, दि. २ (पीसीबी) – दुचाकी वरून जाणाऱ्या दोन तरुणांना अडवून चार ते पाच जणांच्या टोळक्याने मारहाण करत त्यांच्याजवळ गाडी खरेदीसाठी असलेले 35 हजार रुपये रक्कम व फोन हिसकावून घेतला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना 31 डिसेंबर रोजी चिखली येथील मोरे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी अरबाज फिरोज पठाण (वय 18 रा चिंचवड) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी पवन व शिवांग (दोघांचे वय 19 रा चिखली) या दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या इतर साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र श्रेयस पिसाळ हे दुचाकीवरून तळवडे येथे निघाले होते. यावेळी आरोपींनी त्यांना रस्त्यात आवाज देऊन थांबवले. तसेच दोघांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. यावेळी फिर्यादी यांनी माझ्याजवळ पैसे नाहीत असे सांगितले, यावेळी आरोपी दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. व गाडीची चावी काढून घेत दोघांनाही लोखंडी रॉड ने मारहाण करत गंभीर जखमी केले. त्यावेळी फिर्यादी खाली पडले असते त्यांच्या खिशामध्ये गाडी खरेदीसाठी असलेले 35 हजार रुपये व आय फोन काढून घेत तिथून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This Article