चिंचवड,दि.०५(पीसीबी) – पती-पत्नी दोघांच्या नावावर असलेली सदनिका पत्नीच्या परस्पर पतीने विकली. याप्रकरणी पत्नीने पतीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार सन 2012 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीत सह दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 5, चिंचवड येथे घडला.
सुरेश शंकर जुनवणे (वय ५१, रा. औंध, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. सुरेश यांच्या पत्नीने याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती सुरेश या दोघांच्या नावावर औंध येथील शिल्पलेखा बिल्डींगमध्ये सदनिका क्रमांक 10 ही मिळकत होती. सुरेश यांनी पत्नीच्या परस्पर सन 2012 मध्ये फिर्यादी यांच्या नावाचे कुलमुखत्यारपत्र वापरून ती सदनिका एका महिलेला 35 लाख रुपयांना विकली. हा प्रकार मागील काही दिवसांपूर्वी समोर आला असून त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.