येरवडा कारागृहातून त्याने लिहिली अल्पवयीन प्रेयसीला चिठ्ठी

bpcauthor bpcauthor
2 Min Read

तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) – जिच्यामुळे आपण कारागृहात गेलो अशा मुलीची संगत सोडण्याऐवजी तिला चक्क कारागृहातून चिठ्ठी लिहिण्याचा प्रताप एका आरोपीने केला आहे. 21 वर्षीय तरुणाने येरवडा कारागृहातून सतरा वर्षीय मुलीला चिठ्ठी लिहून तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना 25 ऑगस्ट रोजी सकाळी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली आहे.

शिवम विनोद शेळके (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या येरवडा कारागृहात आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 42 वर्षीय आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 30) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवम शेळके हा फिर्यादी यांच्या 17 वर्षीय मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. 29 डिसेंबर 2021 रोजी फिर्यादी यांची मुलगी कॉलेजमध्ये गेली असता आरोपी शिवम याने तिचा पाठलाग केला. ती वर्गात जात असताना तिला अडवून तिचा हात पकडत, कॉलेज संपल्यानंतर मला येऊन भेट नाहीतर मी तुझा जीव घेईन, अशी धमकी त्याने मुलीला दिली. याबाबत फिर्यादी यांच्या मुलीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानंतर 27 जानेवारी 2022 रोजी आरोपी शिवम शेळके याने पीडित मुलीला धमकी देत तिच्या डोक्यात हातोड्याने अनेक घाव घालून तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादी यांची मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी शिवम शेळके याला अटक केली आणि त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली. मात्र येरवडा कारागृहात असतानाही शिवम शेळके याची प्रेमाची आग विझली नाही. त्याने चक्क येरवडा कारागृहातून फिर्यादी यांच्या सतरा वर्षीय मुलीला चिठ्ठी लिहून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच भीतीचे वातावरण निर्माण केले. कारागृहातूनही आरोपी चिठ्ठी लिहून धमकी देऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article