साबरमती नदीत कोरोना विषाणू आढळल्याने मोठी खळबळ

0
393

अहमदाबाद, दि. १८ (पीसीबी) – देशात करोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. मात्र संकट अजून टळलेले नाही. करोनाबाबत रोज काहीतरी नवीन खुलासे होता आहेत. अशीच एक घटना गुजरातमधून समोर आली आहे, जिथे सर्वात महत्वाच्या नदी साबरमती नदीत कोरोना विषाणू आढळल्याची नोंद करण्यात आली आहे. अहमदाबादच्या मध्यभागी असलेल्या साबरमतीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. या सर्वांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

साबरमती व्यतीरीक्त अहमदाबादचे दोन मोठे तलाव कांकरिया आणि चांदोला मध्येही कोरोना विषाणूचे जीवाणू आढळले आहेत. साबरमतीपूर्वी गंगा नदीशी जोडलेल्या वेगवेगळ्या सांडपाण्यामध्ये देखील कोरोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले. आता नैसर्गिक पाण्यातही कोरोनाचे विषाणू दिसू लागल्याने चिंता वाढली आहे.
आयआयटी गांधीनगरने अहमदाबादमधील साबरमती नदीतून पाण्याचे नमुने घेतले होते. त्यांचा अभ्यास केला गेला, प्राध्यापक मनीष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, तपासणी दरम्यान कोरोना विषाणू पाण्याच्या नमुन्यातून सापडला जो अतिशय धोकादायक आहे. पृथ्वी व विज्ञान विभागाचे प्राध्यापक असलेले मनीष कुमार म्हणाले की, पाण्याचे नमुने दर आठवड्यात ३ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२० या काळात नदीतून घेण्यात आले. नमुना घेतल्यानंतर याची तपासणी केली गेली आणि कोरोना विषाणूचे संसर्गित जीवाणू आढळले.
साबरमती नदीतून ६९४ नमुने, कांकरिया तलावातील ५४९ आणि चांदोला तलावामधून ४०२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणू आढळला आहे. नैसर्गिक पाण्यातही विषाणू टिकू शकतो, असा विश्वास संशोधनात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील सर्व नैसर्गिक जल स्त्रोतांचे नमुने घ्यावे, कारण व्हायरसचे बरेच गंभीर म्यूटेशन करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये दिसून आले आहेत, असे मनीषकुमार म्हणाले.