मुदत संपल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेतील विषय समित्या बरखास्त

0
1029

पिंपरी, दि.१६ (पीसीबी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक  अशा चार विषय समित्या कार्यकाळ संपल्याने  आज (सोमवारी) बरखास्त झाल्या आहेत. त्यामुळे सभापतींच्या दिमतीला असलेल्या मोटारी नगरसचिव विभागाने काढून घेतल्या. तर, पालिकेतील दालनावरील नावाच्या पाट्या देखील उतरविल्या आहेत. दरम्यान, या समित्यांचे अधिकार आता महासभेकडे गेले आहेत. राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत महासभेला विषय समित्या गठित करता येणार नाहीत.

कोरोनामुळे पुढील आदेशापर्यंत विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करू नयेत, असा राज्य सरकारचा आदेश आहे. त्यानुसार पालिकेच्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतीक समितीचा एक वर्षांचा कार्यकाळ १४ जून रोजी संपला आहे.

समितीचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आणि पुढील आदेशापर्यंत निवडणूक घेण्यात येवू नयेत, असा आदेश असल्याने या समित्या आज (सोमवारी) बरखास्त झाल्या आहेत.

विषय समिती सभापतींच्या दिमतीला असलेल्या पालिकेच्या मोटारी नगरसचिव विभागाने काढून घेतल्या आहेत. तर, पालिकेतील त्यांच्या दालनावरील नावाच्या पाट्या देखील काढल्या आहेत. या चार समित्यांचे अधिकार आता महासभेकडे गेले आहेत.

महापालिकेत आता स्थायी समिती, जैवविविधता आणि शिक्षण या तीन समित्या अस्तित्वात आहेत. त्यापैकी शिक्षण समितीचा वर्षाचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाल्यानंतर ही समितीही बरखास्त होणार आहे. त्यानंतर केवळ स्थायी आणि जैवविविधता या दोनच समित्या महापालिकेत असणार आहेत.

विषय समित्या गठित करण्याचे अधिकार महासभेला आहेत. परंतु, विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करु नयेत असा राज्य सरकारचा आदेश आहे. जोपर्यंत राज्य सरकार तो आदेश मागे घेत नाही. अथवा विषय समित्यांच्या नवीन नेमणूका करण्यास मान्यता देत नाही. तोपर्यंत महासभेला विषय समित्यांचे गठन करता येणार नाही.

याबाबत बोलताना पालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ”विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण आणि कला, क्रीडा, सांस्कृतीक या चार समित्यांची एक वर्षाची मुदत संपली आहे. त्यामुळे या चारही समित्या बरखास्त झाल्या आहेत. समित्यांचे अधिकार महासभेकडे गेले आहेत.

विषय समिती सभापतींच्या पालिकेच्या मोटारी काढून घेतल्या आहेत. तर, पालिकेतील दालनावरील नावाच्या पाट्या देखील उतरविल्या आहेत. शिक्षण समितीचा कालावधी सप्टेंबर 2020 पर्यंत आहे. त्यानंतर ही समितीही बरखास्त होईल”.