केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; अपघात नव्हे तर हत्या!

bpcauthor bpcauthor
2 Min Read

दि.२३(पीसीबी) – पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरून पाय घसरून दरीत पडल्याने केतनचा मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा विवाह लवकरच होणार होता. लग्नासाठी जयपूरमधील आलिशान पॅलेस बुक करण्यात आला होता. तसेच पाहुण्यांच्या प्रवासासाठी दोन खासगी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, सियाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह फिरण्यासाठी गेलेल्या केतनचा १९ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. मात्र तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी आढळल्याने पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना एका तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. प्रचंड उकाडा असतानाही संबंधित तरुण हुडी घालून वावरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक सखोल तपास केला असता केतनला दरीत ढकलण्यात आल्याचा संशय बळावला.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया गोयल आणि तिच्या मित्राने कट रचून केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलल्याचा आरोप आहे. सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याने केतन गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक खुलाशामुळे संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणामुळे पुण्यासह राज्यभरात खळबळ उडाली असून, अपघात समजल्या गेलेल्या घटनेमागे हत्येचा कट उघड झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र या प्रकरणातील सर्व आरोप आणि तपासाचे निष्कर्ष न्यायालयीन प्रक्रियेत सिद्ध होणे अद्याप बाकी आहे.

Share This Article