सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार

2 Min Read

सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, असे निर्देश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाचा या आदेशामुळे राज्य सरकार अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयबाई वेंकट सूर्यवंशी या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला आहे आणि उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे.

माध्यमांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आमची बाजू ऐकून घेतली. हायकोर्टाचा गुन्हा दाखल करण्याचा निकाल कायम ठेवण्यात आला. पोलिसांनी एफआयआर दाखल केला नाही, म्हणून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघनप्रकरणात कारवाई होते का, ते बघावे लागेल. उच्च न्यायालयाने याप्रकरणात एका आठवड्यात गुन्हा दाखल करा, असे आदेश सरकारला दिले होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणीत तीव्र आंदोलन केले आणि बंद पुकारला होता. या बंदला अचानक हिंसक वळण लागले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. तसेच लाठीचार्जही करण्यात आला. याचवेळी मूळचा लातूरचा आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र अवघ्या दोनच दिवसांत पोलीस कोठडीत सोमनाथचा मृत्यू झाला होता.

सोमनाथच्या आईने या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या याचिकेवर सोमनाथची बाजू मांडली होती. उच्च न्यायालयाने पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणी मोठा विजय मिळाल्याचे बोललं जात आहे.

Share This Article