ठाकरेंच्या शिवसेनेची गळती सुरूच, आता शहरप्रमुख संजोग वाघेरे अजितदादांना भेटले

2 Min Read

पिंपरी, दि . २० ( पीसीबी ) – पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व जुन्या-नव्या सहकार्यांना बरोबर घेऊन मोर्चेबांधनीला लागलेत. महापालिका निवडणुका लक्षात घेऊन अनेक राजकीय पक्षांतील नेत्यांची आवक जावक सुरू आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ताकदिचे नेते अजित गव्हाणे यांच्यासह २५ माजी नगरसेवक आणि ४२ बड्या कार्यकर्त्यांची फौज चार दिवसांपूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामिल झाली. आता मावळ लोकसभा निवडणुकित ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीची उमेदवारी केलेले माजी महापौर आणि शिवसेनेचे शहरप्रमुख संजोग वाघेरे आपल्या शेकडो समर्थकांसह अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश कऱणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेला अक्षरशः गळती लागली असून जेष्ठ माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या पाठोपाठ वाघेरे यांच्या सारखे वर्षभरापूर्वीच पक्षात आलेले दिग्गज नेतेही पक्षाला जय महाराष्ट्र करायला लागल्याने सैनिक सैरभैर आहेत. शिवसेनेला यापेक्षाही आणखी मोठे धक्के बसणार असल्याचे संकेत मिळालेत.
पुढचे पाच वर्षे कुठलेही राजकीय भवित्व्य दिसत नसल्याने तसेच नेते, उपनेत्यांचेही संघटनेकडे लक्ष नसल्याने आता ठाकरेंच्या शिवेसेनेकडे थांबायला कोणीही तयार नाहीत. संजोग वाघेरे आणि त्यांच्या पत्नी उषा वाघेरे हे आजवर सलग सात टर्म महापालिकेत आहेत. संजोग वाघेरे यांची पिताश्री भिकुपाटील वाघेरे हेसुध्दा महापौर होते. त्यांच्या निधनानंतर चिरंजीव म्हणून महापौर पदावर त्यांना संधी मिळाली. पत्नी उषा वाघेरे या स्थायी समिती अध्यक्ष होत्या. २००९ पासून वाघेरे यांनी मावळ लोकसभा लढविण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला. २०२४ मध्ये त्यांनी अजितदादांची साथ सोडली आणि उमेदवारीसाठी थेट ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेचे महायुतीचे उनमेदवार श्रीरंग बारणे यांना भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीची गठ्ठा मते मिळाल्याने वाघेरे यांचे गणित चुकले, साडेपाच लाख मते मिळाली मात्र, त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी विधानसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत चिंचवडच्या उमेदवारीसाठी प्रवेश केल्याने त्या रिक्त पदावर तात्पुरती संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई वगळता शिवसेना नेत्यांचे शहरात लक्ष नसल्याने वाघेरे यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र करायचे ठरवले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्याच आठवड्यात कुंडमळा दुर्घटना स्थळाला भेट देण्यासाठी आले होते. वाघेरे पाटील यांची तिथे अजितदादांशी भेट आणि चर्चासुध्दा झाली. लवकरच वाघेरे पाटील आणि त्यांचे सर्व समर्थक स्वगृही परतणार आहेत.

Share This Article