टीपी स्किम विरोधात शुक्रवारी चऱ्होली ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन

2 Min Read

पिंपरी, दि . २८ ( पीसीबी ) – टीपी स्किम रद्द करण्याचा निर्णय करतो असे सांगून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी ग्रामस्थांची सरळ सरळ फसवणूक केल्याने चऱ्होलीचे सर्व गावकरी संतापले आहेत. आता आरपार ची लढाई म्हणून कुटुंंबासह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय केला असून कडकडीत गावबंद, महापालिका कार्यालयांना टाळे, कराचा भरणा बंद आदी कठोर आंदोलनाची रुपरेषा तयार करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने जाहीर केलेल्या चऱ्होली येथील प्रस्तावित नगररचना (TP Scheme) योजनेविरोधात जनआंदोलन आता तापले आहे. चऱ्होलीमध्ये येत्या शुक्रवारी ३० मे रोजी अत्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे, अशी माहिती माजी महापौर नितीन काळजे यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने चऱ्होली येथे नगररचना योजना प्रस्तावित आहे. नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे चिखलीतील योजना रद्द करण्यात आली. मात्र, चऱ्होलीतील योजना कायम ठेवली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. टीपी रद्द करण्यासाठी आंदोलने सुरू आहे. सुरवातीला गावसभा घेण्यात आली आणि इशारा दिला. नंतर महापालिका भवनात आयुक्त दालनात धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांनी आयुक्तांशी संपर्क केला तेव्हा सोमवार म्हणजे २६ मे पर्यंत सकारात्मक निर्णय करण्याची ग्वाही आयुक्त शेखर सिंह यांनी दिली होती. प्रत्यक्षात आपली फसवणूक होत असल्याचे गावकऱ्यांच्या लढात आल्यावर सर्वजण संतापले आणि शुक्रवारी गावबंद चा निर्णय घेण्यात आला.

भाजपाचे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे, तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रशासनाशी संवाद साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही स्थानिकांनी संपर्क साधला होता. त्यानंतर सोमवारपर्यंत निर्णय अपेक्षित होता. मात्र, अजूनही निर्णय झालेला नाही. यासंदर्भातील श्रेयवाद सोशल मीडियावर रंगला होता. निर्णय न झाल्याने चऱ्होलीकरांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांची बैठक झाली आणि त्यामध्ये शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे येत्या शुक्रवारी चन्होली परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

Share This Article