भाजपचा नेता वयाच्या ६१व्या वर्षी विवाहबंधनात

2 Min Read

दि . १८ ( पीसीबी ) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आता वयाच्या ६१व्या वर्षी विवाहबंधनात अडकणार आहेत. न्यू टाऊनमधील त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी पारंपरिक आणि साध्या पद्धतीने रिंकू मजुमदार यांच्यासोबत त्यांचा विवाह होणार आहे. हा निर्णय बंगालच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजप महिला नेत्या रिंकू मजुमदार ठरणार जीवनसाथी :
रिंकू मजुमदार या दक्षिण कोलकात्यातील भाजप महिला मोर्चाच्या नेत्या आहेत. दिलीप घोष आणि रिंकू यांची ओळख मॉर्निंग वॉकदरम्यान न्यू टाऊनमध्ये झाली होती. ही ओळख हळूहळू दृढ होत गेली आणि शेवटी विवाहाच्या निर्णयापर्यंत पोहोचली. दिलीप घोष यांचा राजकीय पराभव झाल्यानंतर जेव्हा ते काहीसे एकटे पडले होते, तेव्हा रिंकू यांनी त्यांच्यासोबत खंबीर साथ दिली.

या नात्याची सुरुवात रिंकू यांच्या लग्नाच्या प्रस्तावाने झाली होती. रिंकू यांनी दिलीप घोष यांच्या आई पुष्पलता घोष यांची भेट घेऊन त्यांच्या संमतीनेच हे नातं पुढे नेलं. त्यामुळे घोष कुटुंबातील हे लग्न पूर्णतः कौटुंबिक संमतीने ठरत आहे.

रिंकू मजुमदार या घटस्फोटित असून एका मुलाच्या आई आहेत. त्यांचा मुलगा सध्या कोलकात्यातील साल्ट लेक सेक्टर ५ येथील एका आयटी कंपनीत काम करत आहे. काही दिवसांपूर्वी त्या ईडन गार्डन्सवर आयपीएल सामना पाहताना दिसल्या, त्याचदरम्यान या नात्याच्या चर्चा अधिकच जोर धरू लागल्या होत्या.

हा विवाह मोठ्या थाटामाटात न करता फक्त जवळच्या नातेवाइकांच्या आणि मित्रांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. सध्या कोणताही भव्य समारंभ आयोजित करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही दिलीप घोष यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share This Article