स्मार्ट गांजा तस्कराला अटक; सव्वातीन किलो गांजासह बँकेचा स्कॅनर जप्त

PCB Admin
1 Min Read

सांगवी, दि.१९-
गांजा विक्रीचे पैसे थेट बँक खात्यावर घेण्यासाठी इतर दुकानदारांप्रमाणे क्यूआर कोड असलेला स्कॅनर बाळगणारा तस्कर सांगवी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मूळचा ओडिसा येथील असलेल्या गांजा तस्कराकडे तीन किलो 220 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 15) विशालनगर, पिंपळे निलख येथे करण्यात आली.

बसिस्ट जरभान साहू (वय 38, रा. विशालनगर, पिंपळे निलख. मूळ रा. कुंदाबुटला, चुलीफुनका, जि. बालांगीर, ओडिसा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस विशालनगर पिंपळे निलख येथे गस्त घालत असताना पोलिसांना पाहून एक व्यक्ती पळून जाऊ लागला. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगची झेडपी घेतली असता त्यामध्ये तीन किलो 220 ग्रॅम गांजा मिळून आला. तसेच एक मोबाईल फोन आणि बँकेचा स्कॅनर देखील आढळून आला. पोलिसांनी एकूण एक लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी साहू इतर दुकानदारांप्रमाणे बँकेचा स्कॅनर बाळगत असे. गांजा विक्रीतून येणारी रक्कम तो डिजिटल स्वरूपात थेट बँकेच्या खात्यात घेत असे. त्याला न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share This Article