दारु प्यायला पैसे न दिल्याने भोसरीत एकास मारहाण करून लुटले

bpcauthor bpcauthor
2 Min Read

भोसरी, दि. १० (पीसीबी) : दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करत तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवत तरुणाला मारहाण करत लुटले. ही घटना सोमवारी (दि. 8) भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

निलेश फकिरा काळे (वय 31, रा. दिघी. मूळ रा. लोहारा, जळगाव) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल जनार्धन सकट (वय 32), दिपक रामकिशन हजारे (वय 27. दोघेही रा. लांडेवाडी, भोसरी) आणि पवन छगन उजगरे (रा. भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकट आणि हजारे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काळे हे त्यांचा मित्र साजन शेलार सोबत भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूलाखाली उभे होते. त्या वेळी त्यांच्या तोंडओळखीचे असलेले तीनही आरोपी तेथे आले. आरोपी सकट याने फिर्यादीच्या अंगावर कोयता उगारून त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, फिर्यादी यांनी त्यांना पैसे देण्यास विरोध केला. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना मारहान केली. तसेच आरोपीने कोयत्याने वार करत त्यांच्या कानाला दुखापत केली. त्यानंतर आरोपी सकट याने शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेले एक हजार रुपये काढून घेतले. तर आरोपी हजारे याने फिर्यादी यांना खाली पाडून मारहान केली. त्यानंतर आरोपी उजगरे याने फिर्यादी यांच्या पॅन्टच्या खिशातील 700 रुपये काढून घेतले. या प्रकारानंतर आरोपींनी हातातील कोयते हवेत भिरकवत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article