कलाटे यांंच्या माघारीसाठी ठाकरे, पवार, राऊत आग्रही

2 Min Read

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – चिंचवड पोटनिवडणुकित शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी म्हणून थेट उध्दव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत यांच्यासारख्या सर्व बड्या नेत्यांनी फोन केल्याने आता हा अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. दरम्यान, अवघा माघार घेण्यासाठी दुपारी तीन पर्यंत म्हणजे फक्त अर्धा तासाची मुदत असून कलाटे हे स्वतः माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे समजले.

चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनीताई, राष्ट्रवादीकडून नाना काटे तर अपक्ष कलाटे हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. ही लढत बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्न करत होते. प्रत्यक्षात अजित पवार यांनी स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक होणार हे स्पष्ट आहे. फक्त तिरंगी लढत झाली तर मतविभागणीचा फायदा भाजपला होण्याची धास्ती महाआघाडीला आहे, त्यासाठीच कलाटे यांची माघार व्हावी म्हणून शेवटच्याक्षणापर्यंत हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्फत आणि स्वतः कलाटे यांना विनवणी केली. खुद्द शरद पवार यांच्या मार्फत काही नेते निरोप घेऊन आले होते.

शिवसेनेचे संपर्कनेते सचिन आहिर आज सकाळी कलाटे यांच्या ऑफिसमध्ये आले आणि चर्चा केली. त्यावेळी ठाकरे यांच्या बरोबर कलाटे यांचे बोलणे झाले. आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतो, असे कलाटे यांनी तासाभरापूर्वी सांगितले. प्रत्यक्षात अर्धातास बाकी असतानाही कलाटे यांचा कुठलाच निर्णय नसल्याने आता त्यांच्या माघारीची शक्यता धूसर होत चालली आहे.

Share This Article