दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह सज्ज

PCB Admin
2 Min Read

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे.तसेच या घाटांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

शहरात यंदाचा गणेशोत्सव आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत.निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडीमधील जाधव घाट, काळेवाडीमधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहेत.या पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच दि.4 ते 9 सप्टेंबर या कालावधीत विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहील, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन देखील केले जात आहे.पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांना महापालिकेच्यावतीने आवाहन केले जात आहे.नागरिक देखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.अग्निशमन विभागाच्यावतीने शहरातील 26 विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह अग्निशमन पथक तैनात करण्यात आले आहे.क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देखील व्यवस्था करण्यात आली आहे, असे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Share This Article