हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक

1 Min Read

चिंचवड, दि. ४ (पीसीबी) – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या एटीएम कार्डची अदलाबदली केली. व्यक्तीच्या एटीएम कार्ड द्वारे 40 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 30) दुपारी चिंचवड रेल्वे स्टेशन येथे घडली.

उत्तम हरिलाल कलाल (वय 55, रा. ओटास्किम, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कलाल हे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता चिंचवड स्टेशन येथील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी एटीएम सेंटरमध्ये दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी कलाल यांचा एटीएम पिन पाहिला. त्यानंतर त्यांना पैसे काढून देतो असा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड घेऊन हातचलाखीने दुसरे एटीएम कार्ड दिले. त्याच दिवशी कलाल यांच्या कार्डचा वापर करून त्यांच्या खात्यातून 40 हजार रुपये काढून घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Share This Article