३५४ भारतीयांसह दोन विमान दुबई व अबू धाबी वरून भारतात परतले

0
395

प्रतिनिधी (पीसीबी) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याच्या भारत सरकारची मोहीम सुरु झाली आहे. आखाती देशातील युनायटेड आरब आमीरात्स येथील दुबई व अबू धाबी विमानतळातून एअर इंडियाचे दोन विमान भारतात परतले आहेत. या दोन विमानांमध्ये एकूण ३५४ भारतीय नागरिक भारतात परतले आहेत. “वंदे भारत मिशन” असे नाव असलेल्या मोहिमेद्वारे प्रदेशात अडकलेल्या भारतीयांना आपल्या देशात परत आणण्याची भारतीय इतिहासातली सर्वात मोठी मोहीम भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला. ज्यांना भारतात परतायचे आहे अशा नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले. एकट्या आखाती (युनायटेड आरब आमीरात्स, कुवैत, कतार, सौदी अरेबिया, बहारीन आणि ओमान) देशांमधून तब्बल तीन लाख भारतीय नागरिकांनी भारतात येण्यासाठी नोंदणी केली होती. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना आणणे शक्य नसल्याने ज्या नागरिकांचा व्हिसाचा कालावधी संपलेला आहे अथवा जे कामगार आली कालावधीच्या व्हिसावर गेले आहेत किंवा ज्यांना आरोग्य चिकित्सेची आवश्यकता आहे किंवा आपात स्थिति आहे केवळ अशाच नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते. नागरी उड्डाण मंत्रालय व भारतीय नौदलाच्या समुद्री जहाजांच्या मदतीने या नागरिकांना भारतात परत आणले जाणार आहे. या मोहिमेला “वंदे भारत मिशन” असे नाव देण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ६४ विमान व नौदलाच्या तीन जहाजांच्या सहाय्याने तब्बल १५ हजार भारतीय नागरिकांना विविध देशांतून भारतात परत आणले जाणार आहे.

“वंदे भारत मिशन” च्या पहिल्या टप्प्यात युनायटेड आरब आमीरात्स मधील ३५४ भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या दोन विमानांच्या सहाय्याने भारतात परत आणले गेले. एरवी विमानतळावर परतल्यावर स्वागतासाठी नातेवाईकांची गर्दी असते. मात्र आज आलेल्या नागरिकाना वेगळेच दृश्य पहायला मिळाला. आज नातेवाईकांच्या ऐवजी अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पीपीई सूट घातलेल्या कर्मचाऱ्यांनी निर्जंतुकीकरण केलेल्या टर्मिनल मध्ये या प्रवाश्यांना स्क्रिनिंगसाठी नेले. ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे अढळतील अशा लोकांना कोविड रुग्णालयात भरती करण्यात येईल. तसेच इतर प्रवाश्यांना आपापल्या जिल्ह्यात १४ दिवसांसाठी ईन्स्टीट्युशनल क्वारंटाईन करण्यात येणार आहे. परंतु गरोदर महिला व १० वर्षांखालील मुलांना थेट घरी पाठविण्यात येणार आहे. मात्र त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. आज परतलेल्या ३५४ नागरिकांपैकी ६० गरोदर महिलांचा समावेश होता. आज परतलेल्या नागरिकांना प्रवासाचा खर्च स्वत:च करावा लागणार आहे.