२०१९च्या लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका ?

1393

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पना राबविण्याचा विचार वेळोवेळी बोलून दाखविला आहे. मोदी यांनी  नेहमीच याचे समर्थन केले आहे. आता या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार तयारीत असल्याचे संकेत मिळत आहे. त्यानुसार  २०१९ मध्ये होणाऱ्या  लोकसभा   निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह ११ राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता खात्रीशीर सूत्रांकडून वर्तवली जात आहे.  

११ राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्या जाऊ शकतात, त्यासाठी घटनादुरुस्ती करण्याची गरज नाही. मात्र, यासाठी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकमत होणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर किंवा सहा महिने नंतर ज्या विधानसभांचा कार्यकाळ संपत आहे, त्या राज्यात निवडणुका घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे.

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपुष्टात येत आहे. तर  सिक्कीम,  अरुणाचल प्रदेश या राज्यांचा कार्यकाळ एप्रिल २०१९ मध्ये संपणार आहे.  तेलंगणा,  ओदिशा,  आंध्र प्रदेश  या राज्यांचा कार्यकाळ  मे २०१९ मध्ये संपुष्टात येत आहे. हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांचा कार्यकाळ सप्टेंबर २०१९ मध्ये संपणार आहे. तर झारखंड, या राज्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ दिल्लीचा कार्यकाळ २०२० मध्ये संपुष्टात येत आहे. या राज्यातील विधानसभांच्या निवडणुका लोकसभेबरोबर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास निवडणुकीवरील खर्चात बचत होईल. तसेच देशाचे  संघीय स्वरुप आणखी मजबूत होण्यास मदत होईल, अशा आशयाचे पत्र भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लॉ कमिशनला पाठवले आहे. दरम्यान याबाबत लॉ कमिशन सध्या विचार करत आहे. आपल्या अहवालाला अंतिम रुप देण्यापूर्वी राजकीय पक्षांची मतही जाणून घेतली जाणार आहेत.